नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्यानंतर इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीत आणखी एक फूट पडली आहे. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब लोकसभेच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतानाच या उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या 15 दिवसात करणार असल्याचंही आपने जाहीर केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, इंडिया आघाडीतील या फुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणतंही तगडं आव्हान राहणार नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकांची जोरात तयारी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही आपआपली आघाडी मजबूत करण्यावर भर दिला आहे. इंडिया आघाडीत तर जागा वाटपावरूनच अजूनही मारामार सुरू आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खन्ना येथे एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी भगवंत मान यांनी आम आदमी पार्टी पंजाबमधील लोकसभेच्या 13 आणि चंदीगडमधील एक अशा एकूण 14 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या उमेदवारांच्या नावांची घोषणाही लवकर करण्यात येणार असल्याचं भगवंत मान यांनी सांगितलं.
पंजाबच्या खन्ना जिल्ह्यात ही रॅली झाली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होम डिलिव्हरी स्कीमची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान यांनी चंदीगडसह पंजाबमधून आप सर्वच्या सर्व 14 जागा जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला. आमच्याच पारड्यात सर्व जागा येतील. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही, असा दावाही मान यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत बैठका होतील. त्यात उमेदवारांची नावे ठरवली जाईल. ही नावे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केली जातील. पंजाबच्या लोकांनी पारंपारिक राजकीय पक्षांचा सुपडा साफ केला आहे. त्यांचा अहंकार चिरडून टाकला आहे. जो काही अहंकार राहिला असेल तो या लोकसभा निवडणुकीत चिरडला जाईल, असंही भगवंत मान म्हणाले.
दरम्यान, इंडिया आघाडीत फूट पडल्याने त्यावर भाजपने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसला आहे. केजरीवाल यांनी सर्व जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी इंडिया आघाडी निवडणूक लढणार नाही. इंडिया आघाडी कोसळत आहे. या आघाडीचं कोणतंही मिशन नाही. कोणतंही ध्येय नाही. व्हिजन नाही. फक्त कमिशन, भ्रष्टाचार, भ्रम आणि विरोधाभासाची परिस्थिती आहे. राहुल गांधींची न्याय यात्राही विचित्र आहे. ती न्याय यात्रेऐवजी बाय बाय यात्रा अधिक वाटत आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजादा पूनावाला यांनी केली आहे.