भोपाळ : मध्य प्रदेशात लोकायुक्तांनी एका टाकलेल्या छाप्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या कारवाईत बिलखिरिया येथील मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळातील सहायक अभियंता प्रभारी हेमा मीना यांच्या घरातून बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. तिचा पगार फक्त ३० हजार रुपये आहे. हेमाच्या संपत्तीचा अंदाज एकाच गोष्टीवरून लावता येईल की तिच्या घरात सापडलेल्या एका टीव्ही सेटची किंमत 30 लाख रुपये आहे. तिच्याकडे सात कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही संपत्ती इतक्या कमी पगारात कशी जमवली? त्यासंदर्भात तिने दिलेले उत्तरही मजेशीर आहे.
काय म्हणजे हेमा मिना
हेमा मिना हिच्याकडे लोकायुक्तांनी छापा टाकल्यानंतर तिची कसून चौकशी सुरु आहे. तिला नोकरीवरुन निलंबित करण्यात आले आहे. लोकायुक्तांना आतापर्यंत तिच्याकडे सात कोटीची संपत्ती मिळून आली. त्याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, वडील आणि भावाने संपत्ती खरेदी करुन मला भेट दिली. तिचे हे उत्तर ऐकून अधिकाऱ्यांना धक्का बसला. आता तिच्या वडील, भाऊ आणि तिच्यासोबत असणारे कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
१३ वर्षांची नोकरी
लोकायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सहायक अभियंता हेमा मीना यांचे मासिक वेतन ३० हजार रुपये आहे. १३ वर्षांपासून त्या सरकारच्या सेवेत आहेत. पगारानुसार हेमा यांची संपत्ती कमाल १८ लाख रुपये असायला हवी होती. परंतु आतापर्यंत ७ कोटी रुपयांची संपत्ती तिच्याकडे मिळाली आहे.
३० लाखांचा टीव्ही
हेमा मीना यांचा बंगला आलिशान वस्तूंनी भरलेला होता. ३० हजार रुपये मासिक पगार घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याच्या खोलीतून ३० लाख रुपयांचा टीव्ही संच जप्त करण्यात आला आहे. हा नवीनच आणला होता. तो सुरु केला नव्हता. फक्त बॉक्समध्ये पॅक होता. तसेच तिच्या बंगल्यात 2 ट्रक, 1 टँकर, महिंद्रा थार अशी 10 महागडी वाहनेही सापडली आहेत.
अनेक परदेशी श्वान
हेमा मीना तिच्या वडिलांच्या नावावर 20,000 चौरस फूट जागेवर बांधलेल्या 40 खोल्यांच्या बंगल्यात राहते. त्याची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तिच्या फार्म हाऊसमधून 50 हून अधिक परदेशी जातीचे श्वान आहेत. त्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. विविध जातींच्या सुमारे 60-70 गायीही आढळून आल्या.
चपाती बनवण्यासाठी अडीच लाखांचे मशीन
हेमा यांच्या 20 हजार स्क्वेअर फूट परिसरातील बंगल्यात डझनभर कर्मचारी आहे. त्यांच्यांशी बोलण्यासाठी हेमा वॉकीटॉकीचा वापर करते. तिच्या बंगल्यातून चपाती बनवण्याचे मशीनही सापडले आहे. 2.50 लाख रुपये किमतीचे हे मशीन कुत्र्यांसाठी भाकरी बनवण्यासाठी वापरले जाते.
पतीपासून घटस्फोट
पतीपासून घटस्फोट घेतलेली हेमा मीना रायसेन जिल्ह्यातील छपना गावची रहिवासी आहे. 2011 मध्ये त्यांना कंत्राटावर नोकरी मिळाली. सध्या ती मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळात प्रभारी सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.