पटना: पटनाच्या फुलवारी शरीफ परिसरात एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांचा बिहार (bihar ) दौरा या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता. मोदी 12 जुलै रोजी पटना येथे येणार होते. हा हल्ला घडवून आणण्यासाठी मोदी यांच्या दौऱ्याच्या 15 दिवस आधीच फुलवारी शरीफ येथे संशयित दहशतवाद्यांना ट्रेनिंगही दिली जात होती. त्याच ठिकाणी छापा मारून संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेणायत आलं आहे. पोलिसांनी (police) याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. मोहम्मद जलालुद्दीन असं या झारखंड पोलीसमधून निवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. तर दुसऱ्याचं नाव अतहर परवेज आहे. पटना येथील गांधी मैदानात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या मंजरचा परवेज सख्खा भाऊ आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित दहशतवादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित आहेत. पोलीसांनी या दोघांकडून पीएफआयचा झेंडा, बुकलेट, पत्रकं आणि बरीच संशयित कागदपत्रे जप्त केली आहे. यात भारताला 2047मध्ये इस्लामिक देश बनविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हे दोन्ही संशयित दहशतवादी गेल्या काही काळापासून पटना फुलवारी शरीफ येथे दहशतावाद्यांची कॅम्प चालवत होते. अतहर परवेज मार्शल आर्ट आणि शारीरिक शिक्षणाचे धडे देत होता. तर मोहम्मद जलालुलद्दीन एक एनजीओ चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार अतहरने मोहम्मद जलालुद्दीन राहत असलेल्या फुलवारीशरीफ येथे एक पॅलेस खरेदी केला होता. नव्या टोला परिसरात फ्लॅट खरेदी केला होता. त्यासाठी 16000 रुपये भाडे देत होता. इथूनच तो देशविरोधी कारवाया करत होता.
परवेज आणि मोहम्मद दोघेही एनजीओच्या नावाखाली दहशतवाद्यांची फॅक्ट्रीच चालवत होते असं सांगितलं जातं. हिंदुंच्या विरोधात मुस्लिमांना भडकावणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. मुस्लिम तरुणांना हे दोघेही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर आणि जिल्हा स्तरावरील पीएफआय आणि एसडीपीआयच्या सक्रिय सदस्यांसोबत त्यांच्या बैठका व्हायच्या. सिमीच्या तुरुंगात बंद असलेल्या जुन्या सदस्यांचे दोघेही जामीन करायचे आणि दहशतवादी ट्रेनिंगही द्यायचे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 6 आणि 7 जुलै रोजी अतहर परवेजने भाड्याने एक कार्यालय घेतले होते. तिथे तरुणांना मार्शल आर्ट आणि शारीरिक शिक्षणाचे धडे देण्याच्या नावाखाली बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणांना शस्त्र चालवण्याची ट्रेनिंग दिली जात असे. नंतर या तरुणांची माथी भडकावली जात होती. याबाबतची माहिती आयबीला मिळाली होती. त्यानंतर आयबीने 11 जुलै रोजी नया टोल नाका परिसरात पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतलं.
केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि अनेक राज्यातून तरुण या ठिकाणी येऊन ट्रेनिंग घेत होते. या दोन्ही संशयित अतिरेक्यांना पाकिस्तान, बांगलादेश आणि तुर्की सहीत अनेक इस्लामिक देशातून फंडिंग मिळत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.