नवी दिल्ली : बिहार(Bihar)मधल्या समस्तीपूर(Samastipur)मधून एक विचित्र प्रकरण समोर आलंय. एका आशा वर्करच्या संगनमतानं एका महिलेनं अवघ्या 3 महिन्यांत 12 दिवसांच्या अंतरानं दोनदा मुलांना जन्म दिलाय. या फसवणुकीची माहितीही आरोग्य विभागाला नव्हती. महिलेनं दोन्ही वेळा मुलाला जन्म दिला.
योजनेचा लाभ घेण्यासाठी…
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण समस्तीपूरच्या उजियारपूर पीएचसीचं आहे. हरपूर रेबारी गावातील एका महिलेला दोन्ही वेळा उजियारपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथं तिची प्रसूती झाली. जननी बाल सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेनं ही फसवणूक केली.
3 महिन्यांत 12 दिवसांच्या अंतरानं दोनदा जन्म
माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, 28 वर्षीय महिलेनं गावातील रहिवासी आशा रीता देवी यांच्या मदतीनं हा पराक्रम केला. रुग्णालयातील नोंदीनुसार, 24 जुलै रोजी तिला पहिल्यांदा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी महिलेनं एका मुलालाही जन्म दिला. यानंतर, महिलेला पुन्हा 3 नोव्हेंबर रोजी उजियारपूर पीएचसीमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं आणि 4 नोव्हेंबर रोजी तिनं एका मुलाला जन्म दिला. यानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.
प्रसूतीचा रेकॉर्ड तयार करताना फसवणूक उघड
उजियारपूर पीएचसीमध्ये जननी बाल सुरक्षा योजनेसाठी नोव्हेंबर महिन्यात प्रसूतीचा रेकॉर्ड तयार करण्यात येत होता. यादरम्यान ही बाब उघडकीस आली. या महिलेची 24 जुलै रोजी प्रसूतीही झाल्याचं रेकॉर्डमध्ये आढळून आलं. त्यासाठी त्यांना जननी बाल सुरक्षा योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कमही मिळाली होती. ही बाब उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.