Train Accident : रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच मोठा अपघात, एक्सप्रेस घसरल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू; 200 जखमी

| Updated on: Oct 12, 2023 | 7:04 AM

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात काल मध्यरात्री रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. एक्सप्रेसचे सहा डबे घसरल्याने या अपघातात मोठी जीवित हानी झाली आहे. तसेच अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

Train Accident : रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच मोठा अपघात, एक्सप्रेस घसरल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू; 200 जखमी
Train Accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बक्सर | 12 ऑक्टोबर 2023 : बिहारच्या बक्सरमध्ये मध्यरात्री रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 200 प्रवाशी जखमी झाले आहेत. दिल्लीहून कामाख्या जात असलेल्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला बिहारच्या बक्सर जिल्ह्यात अपघात झाला. या एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्याचं बक्सरचे डीएम अंशूल अग्रवाल यांनी सांगितलं. मध्यरात्री हा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी बचावकार्य सुरू असून ते अजूनही सुरूच आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वेचे कर्माचारी घटनास्थळी दाखल झाले.

हा रेल्वे अपघात बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डीडीयू-पटना रेलखंडच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ झाला आहे. अपघातग्रस्त झालेल्या रेल्वेतील प्रवाशांना गावाला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी एक रॅक पाठवण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गावाला जाता येणार आहे. ही एक्सप्रेस बक्सरहून आराला जात होती. त्यावेळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. बक्सरच्या रघुनाथपूर रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. ट्रेन या ठिकाणी पोहोचताच सहा डबे रुळावरून उतरल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

रेल्वे मंत्र्याचं ट्विट

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे मंत्र्यांनी ट्विट केलं आहे. बचावकार्य पूर्ण झालं आहे. सर्व डब्यांची माहिती घेतली आहे. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

बक्सरमधून 10 रुग्णवाहिका घटनास्थळी

या अपघातात अनेक प्रवाशी डब्यात अडकल्याचं सांगितलं जात होतं. रात्र असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केलं होतं. तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बक्सरहून 10 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ज्या रघुनाथपूर स्टेशनजवळ एक्सप्रेसचे डबे घसरले त्या स्टेशनवर ही एक्सप्रेस थांबत नाही. या एक्सप्रेसचा तो स्टॉपेज नाही. बक्सरहून निघून ही गाडी थेट आरा आणि त्यानंतर पटनाला थांबते. दरम्यान, अपघात का झाला याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

हेल्प नंबर जारी

दरम्यान, रेल्वेने हेल्प नंबर जारी केले आहेत. पटनासाठी- 9771449971, दानापूरसाठी 890569749 आणि आरासाठी- 8306182542 हेल्प नंबर जारी करण्यात आले आहेत. कंट्रोल रूमसाठी 7759070004 हा नंबर जारी करण्यात आला आहे.