अहमदाबाद: गुजरातमध्ये काँग्रेसने खातं उघडलं आहे. गुजरामध्ये काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजल्यापासून गुजरात विधानसभेसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच कौल येण्यास सुरु झालं आहे. त्यात भाजपने तरी बाजी मारल्याचं चित्रं आहे.
सकाळी 8 वाजता गुजरात विधानसभेसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या मतमोजणीत आपला दोन जागांवर आघाडीवर आहे. एकूण 182 जागांसाठी राज्यात मतमोजणी सुरू आहे.
राज्यात भाजपची सत्ता आहे. ही सत्ता राखण्यात भाजप पुन्हा यशस्वी ठरते की काँग्रेस बाजी मारते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय आपनेही गुजरातमध्ये प्रवेश केल्याने आपला कितपत यश मिळतं याकडेही राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा घेऊन संपूर्ण गुजरात पिंजून काढलं होतं. भाजप नेते अमित शहा यांच्यापासून अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी आलं होतं. या शिवाय भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्रीही निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये आले होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये आले होते. तसेच राज्यातील अनेक भाजपनेतेही या प्रचारात सामील झाले होते. त्या मानाने काँग्रेसचा प्रचार मंदावलेलाच होता. राहुल गांधी यांच्या दोन चार सभांचा अपवाद वगळता गुजरातमध्ये काँग्रेसचा फारसा प्रचार दिसला नव्हता.