बंगळुरु : देशात निवडणुकीच वार वाहू लागलय. पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. त्याआधी राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. आता एका काँग्रेस आमदाराने धक्कादायक वक्तव्य केलय. काँग्रेस आमदाराने हा आरोप करुन नवीन खळबळ उडवून दिली आहे “एकगठ्ठा हिंदू मतांसाठी भगवा पार्टी राम मंदिरावर बॉम्बफेक करुन आरोप मुस्लिमांवर करेल. हे सर्व लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी होऊ शकतं” असा गंभीर आरोप काँग्रेस आमदाराने केलाय. कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी.आर.पाटील यांनी हे वक्तव्य केलय.
कर्नाटक भाजपाने X वर (टि्वटर) हा व्हिडिओ शेअर केलाय. मोदींनी पुढची लोकसभा निवडणूक जिंकावी यासाठी भाजपा राम मंदिरावर बॉम्ब फेक करु शकते आणि एकगठ्ठा हिंदू मत मिळवण्यासाठी आरोप मुस्लिमांवर लावला जाऊ शकतो” असं बी.आर.पाटील या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतायत. पाटील यांनी हे विधान कधी केलं? त्या बद्दल स्पष्टता नाहीय. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
‘हिंदुत्वाच्या पायावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय’
बी.आर.पाटील यांच्या या व्हिडिओवरुन भाजपाने काँग्रेसला टार्गेट केलय. काँग्रेस पक्ष हिंदू-मुस्लिम तणावाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केलाय. “काँग्रेसच्या सदस्यांनी हिंदुत्वाच्या पायावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. त्याशिवाय राम मंदिराकडे वक्रदृष्टी वळवलीय. हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून काँग्रेसने सरकारवर आरोप करण्यासाठी आधार तयार केलाय. काँग्रेसच्या मंत्र्याने चुकून तो उल्लेख केला” असं भाजपाने X वर म्हटलय.
भाजपाने ‘या’ राज्यात लोकसभेच्या किती जागा जिंकलेल्या?
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकूण 25 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या वाट्याला फक्त 3 जागा आल्या. यावर्षी एप्रिल-मे मध्ये कर्नाटकात विधानसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली. भाजपाला सत्तेवरुन खाली खेचलं. काँग्रेसच पूर्ण बहुमताच सरकार सध्या कर्नाटकात सत्तेवर आहे.