JDU-BJP : बिहारमधील राजकीय हालचालींवर आरजेडी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एका राज्यात भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजकीय गोंधळ संपवण्याची विनंती करतो. राजदने असे कधीच केले नाही. सायंकाळपर्यंत संभ्रम दूर होईल, अशी आशा आहे. नितीशकुमार एनडीएमध्ये गेल्यास इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. कारण आधीच दोन पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
नितीन कुमार यांनी भाजपसोबत आधी सत्ता स्थापन केली होती. पण नंतर त्यांनी आरजेडी सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सांगितले की, आमचे केंद्रीय नेतृत्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. नेतृत्व गांभीर्याने विचार करूनच कोणताही निर्णय घेईल.
लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीतही बिहारमध्ये एनडीए इतका मजबूत आहे की आम्ही 40 पैकी 40 जागा जिंकू शकतो. मला माहित नाही की नितीश कुमार एनडीएचा भाग बनतील की इंडिया आघाडीत राहतील. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.