MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील सस्पेंस अखेर संपला आहे. कारण भारतीय जनता पक्षाने सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. मोहन यादव हे मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
उज्जैन दक्षिण मतदारसंघातून मोहन यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा बारा हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. मोहन यादव यांना 95,699 मते तर चेतन प्रेमनारायण यादव यांना 82,758 मते मिळाली आहेत. मोहन यादव हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. यादव हे शिवराज सिंह सरकारमध्ये शिक्षणमंत्रीही होते.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला हे उपमुख्यमंत्री असतील. त्याचवेळी नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
राज्यात दणदणीत विजयानंतर भाजपने मनोहर लाल खट्टर, डॉ. के लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. या तीन नेत्यांकडे मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी देण्यात आली होती. सर्व निरीक्षकांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाची बैठक झाली, त्यात मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
मोहन यादव यांचा जन्म २५ मार्च १९६५ रोजी उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पूनमचंद यादव आहे. तीन वेळा आमदार राहिलेले यादव यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांनी राज्यशास्त्रात B.Sc., LLB., M.A., M.B.A आणि Ph.D केले आहे.