नवी दिल्ली: देशात सर्व प्रकारचं राजकारण सुरू आहे. एक राजकारण एखाद्या कुटुंबाच्या भक्तीचं आहे. तर दुसरं राजकारण देशभक्तीचं सुरू आहे. देशातील काही राजकीय पक्ष केवळ आपल्याच कुटुंबासाठी काम करत आहेत. भाजपने (bjp) घराणेशाहीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि हाच निवडणुकीचा मुद्दा बनवला. घराणेशाहीवाले पक्ष आणि सरकारे देशाचे दुश्मन आहेत. त्यांना संविधानाशी काहीही घेणं देणं नाही हे लोकांच्या लक्षात आलं आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी केली. भाजपच्या 42व्या स्थापना दिवसानिमित्त ते व्हर्च्युअली कार्यकर्त्यांशी संबोधित करत होते. यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला (congress) लक्ष केलं. अनेक दशकांपासून काही लोकांनी मतांचं राजकारण केलं. मूठभर लोकांना आश्वासन द्यायचं आणि इतरांना ताटकळत ठेवायचं अशा पद्धतीचं काम सुरू होतं. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे सर्व काही व्होटबँकेच्या राजकारणाचे साईड इफेक्ट्स आहेत, अशी टीकाही मोदींनी केली.
भाजपने भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाशी संघर्ष केला. देशावासियांना या राजकारणाचं नुकसान लक्षात आणून देण्यास भाजप यशस्वी ठरली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सबका साथ, सबका विकास या मंत्राच्या माध्यमातून आम्ही सर्वांचा विश्वास प्राप्त करत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहोत. इतक्या कठिण प्रसंगातही भारत 80 कोटी गरीब, वंचितांना मोफत राशन देत आहे हे जग सुद्धा पाहत आहे. 100 वर्षातील या सर्वात मोठ्या संकटाच्या काळातही गरीब लोक भुकेले राहू नयेत यासाठी केंद्र सरकारने 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कोणत्याही दबावाशिवाय आणि कोणत्याही भीती शिवाय आज भारत जगासमोर आपल्या हितासाठी ठामपणे अडून आहेत. जेव्हा जग परस्परविरोधी भूमिका घेत आहे. तेव्हा भारत हा मानवतेसाठी लढताना दिसत आहे. आमचं सरकार राष्ट्रीय हिताचे काम करत आहे. आज देशाकडे धोरणं आहेत. नियतही आहे आणि निर्णय शक्तीही आहे. निश्चयशक्ती सुद्धा आहे. आज आम्ही ध्येय बाळगतो आणि ते ध्येय पूर्णही करतो, असंही मोदी म्हणाले.
भाजपचा यावेळचा स्थापना दिवस तीन कारणांनी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे आपण देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. प्रेरणा घेण्यासाठी ही मोठी संधी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेगाने जागितक बदल होत आहे. त्यामुळे भारतासाठी सातत्याने नव्या संधी निर्माण होत आहेत. तिसरं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये चार राज्यात भाजपचं सरकार आलं आहे. तसेच तीन दशकानंतर राज्यसभेत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाची सदस्य संख्या 100 पर्यंत गेली आहे, असंही ते म्हणाले.
A special occasion for us BJP Karyakartas. Addressing on the Party’s #SthapnaDiwas. https://t.co/KCUiiBDLcw
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2022
संबंधित बातम्या: