अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने या राज्यातील भाजप सरकार धोक्यात

| Updated on: May 07, 2024 | 7:20 PM

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला एका राज्यात धक्का बसला आहे. अपक्ष आमदारांनी निवडणुकीदरम्यानच भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसने भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.

अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने या राज्यातील भाजप सरकार धोक्यात
Follow us on

BJP Government : देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण असताना हरियाणात मात्र भाजप सरकार धोक्यात आलं आहे. नायब सिंग सैनी यांच्या सरकारला संकटाचा सामना करावा लागत आहे. भाजप सरकार आता अल्पमतात आले आहे. हरियाणा काँग्रेसने हा दावा केला आहे. अपक्ष आमदारांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केलीये. त्यामुळे हे राजकीय संकट निर्माण झाले आहे. हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान म्हणाले की, हरियाणा विधानसभेचे सध्याचे संख्याबळ ८८ आहे. भाजपकडे ४० आमदार आहेत. याआधी भाजप सरकारला जेजेपी आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, मात्र आता जेजेपी आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने सैनी सरकारने बहुमत गमावले असून त्यांना एक मिनिटही सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही.

तीन आमदारांनी पाठिंबा काढून घेतला

लोकसभा निवडणुकीच्या वेळी हरियाणातील भाजप सरकारला अपक्ष आमदारांनी झटका दिला आहे. अपक्ष आमदार सोंबीर सांगवान, रणधीर गोलन आणि धरमपाल गोंदर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केलीये. रोहतकमध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा आणि उदय भान यांच्या उपस्थितीत अपक्ष आमदारांनी ही घोषणा केली.

धरमपाल गोंदर काय म्हणाले

धरमपाल गोंदर म्हणाले की, “आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आम्ही हा निर्णय घेतला आहे.” उदय भान म्हणाले, “तीन अपक्ष आमदार सोंबीर सांगवान, रणधीर गोलन आणि धरमपाल गोंडर यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

हरियाणा विधानसभेतील संख्याबळ

विद्यमान आमदार – ८८
बहुमतासाठी – ४५ आमदार
सरकारकडे- 43 आमदार आहेत
भाजप- 40
काँग्रेस- ३०
JJP-10
अपक्ष- 6

काय म्हणाले दीपेंद्र सिंह हुड्डा?

रोहतक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दीपेंद्र सिंह हुडा म्हणाले की, राज्यातील परिस्थिती भाजपच्या विरोधात झाली आहे. बदल निश्चित आहे. भाजप सरकार अल्पमतात आले आहे. त्यांनी 48 आमदारांची यादी दिली आहे, त्यापैकी काहींनी लोकसभा निवडणूक लढवत असल्याने राजीनामा दिला आहे. काही अपक्ष आमदारांनी आज भाजपचा पाठिंबा काढून काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.