पणजी | 12 जानेवारी 2024 : गोव्यातील राजकीय वातावरणातील आरोपांचा धुरळा अजूनही थांबलेला नाही. आता भाजपच्या एका नेत्याने आपल्याच दिवंगत नेत्यावर जोरदार आरोप केला आहे. भाजपचे नेते आणि पणजीतील आमदार अतानासियो मोनसेरेट ऊर्फ बाबूश यांनी गोव्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर टीका केली आहे. बाबूश यांनी पर्रिकर यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप लावले होते. बाबूश यांच्या या आरोपांचा पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी पलटवार केला आहे. मात्र, भाजपच्याच नेत्याने आपल्याच बड्या आणि दिवंगत नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आमदार अतानासियो मोनसेरेट ऊर्फ बाबूश यांनी पणजीच्या विकासाच्या मुद्द्यावरून ही टीका केली होती. पणजीच्या जागवर अडीच दशके मनोहर पर्रिकर यांचा दबदबा होता. पर्रिकर यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्या मुलाला उत्पल यांना लढायचं होतं. पण पक्षाकडून बाबूश यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे उत्पल हे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत उत्पल यांना पराभव पत्करावा लागला होता. बाबूश या निवडणुकीत जिंकले होते.
बुधवारी गोव्याच्या विकासा संदर्भात बैठक झाली. यावेळी बाबूश यांनी ही धक्कादायक टीका केली. पर्रिकर यांनी चौधरी नावाच्या व्यक्तिला समार्ट सिटी योजनेचा संचालक म्हणून नियुक्त केलं होतं. या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. जवळच्या लोकांना बेकायदेशीरपणे ठेके दिले, असा आरोप बाबू यांनी केला होता.
पक्षाच्याच आमदाराने पर्रिकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी बाबूश यांचे दावे खोडून काढले आहेत. माझ्या वडिलांच्या काळात स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात करण्यास आणि तिची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली होती. चौधरी यांची नियुक्ती पारदर्शी पद्धतीने करण्यात आली होती. त्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली होती, असं उत्पल यांनी म्हटलं आहे.
भाजपने पहिल्यांदाच पणजीत विजय मिळवला आहे. त्यापूर्वी मीच पणजी जिंकलाय असं पर्रिकर म्हणायचे. मी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यामुळे भाजप पणजीत जिंकला आहे, असं म्हणूनच बाबूश थांबले नाहीत, तर पर्रिकर यांना कधीच भाजप आपला वाटला नाही. पर्रिकर स्वत:च्याच प्रेमात होते. त्यांच्यासाठी सर्वात आधी ते होते. नंतर भाजप होती, असा दावाही बाबूश यांनी केला होता.
दरम्यान, या सर्व प्रकारावर गोव्यातील भाजपचे प्रवक्ते गिरीराज पई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिवंगत मनोहर पर्रिकर यांचं गोवा आणि देशासाठीचं योगदान मोठं आहे. ते सर्वात मोठे नेते होते. आज लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. हे योग्य नाही. त्यांचं काम आणि देशासाठी दिलेल्या योगदानामुळेच त्यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. गोवाच नव्हे तर देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी पणजीसाठीही मोठं योगदान दिलंय. त्यांनी नेहमीच देशाचं भलं पाहिलं आहे, हे सत्य आपल्याला नाकारता कामा नये, असं गिरीराज पई यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी गोव्याचे पीसीसी प्रमुख अमित पाटकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भाजपमध्ये फूट पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं काँग्रेस सातत्याने म्हणत होती. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनीच प्रतिक्रिया दिली पाहिजे, असं अमित पाटकर यांनी म्हटलं आहे.