भाजप खासदाराकडून भर संसदेत बसपा खासदाराला शिवीगाळ

| Updated on: Sep 22, 2023 | 10:21 PM

भाजप खासदाराने भर सभेत बहुजन समाज पक्षाच्या खासदाराला शिवीगाळ केलीय. त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. विरोधी पक्षांनी शिवीगाळ देणाऱ्या खासदारावर कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केलीय.

भाजप खासदाराकडून भर संसदेत बसपा खासदाराला शिवीगाळ
Follow us on

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : भाजप खासदाराने भर संसदेत सभागृहातील बहुजन समाज पक्षाच्या खासदारावर शिवीगाळ केल्याने नवा वाद निर्माण झालाय. सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने भर संसदेत अशाप्रकारे वक्तव्य करणं हे लाजिरवाणं आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून देण्यात येत आहे. संबंधित प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या खासदारावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. विरोधक या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या आणि इतर खासदारांवर जशी कारवाई करण्यात आली तशी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

भर लोकसभेत बसपा खासदार कुँवर दानिश अली यांच्यावर शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचं रमेश बिधूडी असं नाव आहे. लोकसभेत गुरुवारी (21 सप्टेंबर) ‘चांद्रयान 3’ च्या यशावर चर्चा सुरु होती. यावेळी रमेश बिधूडी यांनी बसपा खासदार कुँवर दानिस अली यांच्यावर अर्वाच्या शब्दांत शिवीगाळ केली. यानंतर संसदेत एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षांनी खासदार रमेश बिधूडी यांच्याविरोधात कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.

राजनाथ सिंह यांच्याकडून खेद व्यक्त

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदार रमेश बिधूडी यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेत इशारा दिला. रमेश बिधूडे यांनी पुन्हा तसं कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लोकसभा अध्यक्षांनी दिला. रमेश बिधूडी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा सभागृहात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी बिधूडी यांच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला.

दानिश अली यांची कारवाईची मागणी

दुसरीकडे खासदार दानिश अली यांनी बिधूडी यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली. “मला न्याय मिळेल आणि अध्यक्ष कारवाई करतील, अशी आशा आहे. याप्रकरणी कारवाई नाही झाली तर मी दुखदपणे हे सभागृह सोडण्याचा विचार करेन”, असं दानिश अली म्हणाले आहेत.

दरम्यान, रमेश बिधूडी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा खासदार हर्षवर्धन हसले, अशी टीका होत आहे. त्यावर हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिलंय. बिधूडी यांनी केलेल्या वक्तव्यावर आमचे नेते रामनाथ शिंह यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी बिधूडी यांच्या वक्त्यावर टीका केलीय. तरीही माझं नाव यामध्ये जाणीवपूर्वक घुसवलं जात आहे, अशी भूमिका हर्षवर्धन यांनी मांडली.