नवी दिल्ली | 4 मार्च 2024 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी जेपी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ते गुजरातच्या जागेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी हिमाचलच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी हिमाचलच्या जागेचा राज्यसभेचा राजीनामा दिला असला तरी ते गुजरातच्या राज्यसभेच्या जागेवरुन खासदार असणार आहेत.
राज्यसभेकडून याबाबत अधिकृतपणे माहिती जारी करण्यात आली आहे. “हिमाचल प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभाचे सदस्य जगत प्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत आपल्या जागेचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींनी 4 मार्चला स्वीकारला आहे”, असं राज्यसभेच्या संसदीय बुलेटीनमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, जेपी नड्डा आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरात भाजपचं आज ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’चं आयोजन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने यातून ‘मिशन युवा मतदार’ ही मोहीम सुरु केली आहे. महाराष्ट्रातून आज भाजपच्या ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’त एक लाख तरुण सहभागी झाले. या कार्यक्रमात विदर्भातील महायुतीचे सर्व खासदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीदेखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’त तरुण खासदार म्हणून नवनित राणा मार्गदर्शन करणार असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना डोळ्यांसमोर ठेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.