संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, जयपूर | 12 डिसेंबर 2023 : राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानला आता नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. विशेष म्हणजे राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची निवड करतानादेखील भाजपने धक्कातंत्र दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये ज्या नेत्यांची नावे होती त्यापैकी कुणाचीही निवड न होता भाजप नेते भजनलाल शर्मा यांची निवड झाली आहे. भाजपने छत्तीसगडमध्ये धक्कातंत्र दिलं, त्यानंतर मध्य प्रदेश आणि आता राजस्थानमध्येही धक्कातंत्र देत भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून यावेळी राजस्थानमध्ये ब्राह्मण चेहरा द्यायचा प्रयत्न झाला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पर्यवेक्षक विनोद तावडे आणि इतर नेते आज जयपूरला दाखल झाले. या नेत्यांची आज आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे या स्वत: होत्या. भाजपकडून त्यांच्यावरच पुन्हा जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. तसेच दुसऱ्या कुणाची निवड केली तर त्यांची नाराजी रोखणं हे भाजपसाठी मोठं आव्हान ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. असं असताना आता भाजपने भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे. भजनलाल शर्मा हे सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला द्यायची याबाबत मोठं आव्हान होतं. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. या यादीत पहिलं नाव वसुंधरा राजे यांचं होतं. वसुंधरा राजे या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आहेत. याशिवाय बाबा बालकनाथ यांच्याही नावाची चर्चा होती. तसेच गजेंद्र शेखावत, सीपी जोशी, दीया कुमारी आणि राजवर्धन राठोड या नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण भाजपने शर्यतीत नसलेल्या नेत्याच्या नावाची निवड केली.
भजनलाल शर्मा हे जयपूरच्या जवाहर सर्किल येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे भरतपूरचे आहेत. ते भाजपच्या पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ते प्रदेश महामंत्री म्हणून देखील कार्यरत होते. भाजपने त्यांना या निवडणुकीत पहिल्यांदाच जयपूरच्या सांगानेर मतदासंघातून उमेदवारी दिली होती.
विशेष म्हणजे या मतदारसंघातील तत्कालीन आमदाराचं तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना तिकीट देण्यात आलं होतं. सांगानेर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. अशा सुरक्षित मतदारसंघातून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत भजनलाल शर्मा यांचा विजय झाला. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी भजनलाल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.