Ram Mandir Pran Pratishtha | आज अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा भव्य सोहळा होणार आहे. 500 वर्षानंतर राम आपल्या गर्भगृहात विराजमान होतील. या क्षणाकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा आज संपूर्ण देशात मोठा उत्साह दिसून येत आहे. 8 हजार व्हीआयपींना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. उद्योग, चित्रपटासह विविध क्षेत्रातील मान्यवर राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्व बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतील. फक्त एका नेत्याची उणीव सर्वांना जाणवेल. कारण राम जन्मभूमी आंदोलनात, भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचं मोठ योगदान आहे. 90 च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात त्यांनीच केली. त्यांनीच संपूर्ण देश पिंजून काढला. राम मंदिर निर्माणाची चेतना निर्माण केली. आज तेच या कार्यक्रमाला उपस्थित नसतील.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी म्हणजे राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा. 90 च्या दशकात संपूर्ण देशात राम जन्मभूमी आंदोलनाने जोर पकडला, त्यावेळी आडवाणींनी या आंदोलनाच नेतृत्व केलं. आज तेच लालकृष्ण आडवाणी रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. थंडी आणि खराब हवामानामुळे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. आडवाणी आता 96 वर्षांचे असून त्यांची प्रकृती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. लालकृष्ण आडवाणींना निमंत्रण दिलं. त्याचवेळी ते सहभागी होणार नाहीत, अशी शक्यता होती.
निमंत्रण मिळालं त्यावेळी ते काय म्हणाले?
आरएसएसचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणींच्या घरी जाऊन त्यांना मंदिर उद्गाटन सोहळ्याच निमंत्रण दिलं होतं. अशा भव्य प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मिळतेय, हे सौभाग्य आहे असं आडवाणी म्हणाले होते. आयोजक आडवाणींना कार्यक्रमाच्यास्थळी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणार होते. अयोध्येत आज सकाळी 6 वाजता 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानुसार, आज अयोध्येत कोल्ड डे ची स्थिती आहे. आज कमीत कमी तापमान 7 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 16 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.