संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 2 जानेवारी 2024 : गेल्या दहा वर्षापासून भाजप देशातील सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष ठरला आहे. केंद्राबरोबरच देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. दहा वर्षानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओढा अधिक वाढला आहे. अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये येत आहेत. भाजपकडूनही या नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. पण आता प्रवेश देताना चाळणी लावण्यात येणार आहे. यापुढे भाजपमध्ये कुणालाही थेट प्रवेश मिळणार नाही. कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही हे ठरवण्यासाठी भाजपने एक समितीच स्थापन केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या परवानगी नंतरच बाहेरच्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार या समितीलाच देण्यात आला आहे.
भाजपने एकूण 8 जणांची समिती स्थापन केली आहे. आठ जणांमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव आणि मनसुख मांडविया यांचा समावेश आहे. तर तीन राष्ट्रीय महासचिव म्हणजेच विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बंसल यांचाही या समितीत समावेश असणार आहे. याशिवाय समितीत मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनाही स्थान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचा या मुख्य समितीत समावेश झाला आहे. त्यामुळे पक्षात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हे आता तावडेही ठरवणार आहेत.
या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती बनवली जाणार आहे. ती समिती त्या त्या राज्यात इतर नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेश बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे राज्यांमधील समितीतही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होणार आहे. मात्र, ही समिती त्या त्या राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार होईल की भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली तयार होईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षाचे महत्त्वाचे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. अनेक नेत्यांनी तर भापजच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कही साधला आहे. त्यामुळे या नेत्यांचा पक्षात कशा पद्धतीने समावेश करायचा? त्यांना कोणती पदे द्यायची? कोणती जबाबदारी द्यायची? ते कोणत्या भागातील आहेत, त्यांच्या येण्यामुळे पक्षाला किती फायदा होऊ शकतो? आदींचा आढावा घेऊनच ही समिती पुढचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.