Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या मैदानात राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रादेशिक पक्षांना जोडण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दोघेही तयारीला लागले आहेत. एकीकडे इंडिया आघाडीतून प्रादेशिक पक्ष बाहेर पडत असताना भाजपने मात्र जुन्या पक्षांना सोबत आणण्याची तयारी सुरु केली आहे. इंडिया आघाडीतून नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरवाल यांचा आप पक्ष बाहेर पडल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आता यूपीमध्ये आरएलडी, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी, महाराष्ट्रात मनसेला भाजपसोबत घेण्याची तयारी सुरु आहे.
दुसरीकडे ‘आप’ पंजाबमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. पंजाबमध्ये ते काँग्रेसला जागा द्यायला तयार नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी देखील काँग्रेसला सोबत घेण्यास नकार देत आहेत. तर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांमधील नाराजी वाढत असल्याने इंडिया आघाडीला एकामागे एक धक्के लागत आहेत. दुसरीकडे या उलट भाजप एक एक पक्षाला आपल्या सोबत जोडत आहे.
प्रादेक्षिक पक्षांना भाजपसोबत घेण्यासाठी भाजपने स्वतंत्र प्रवेश समितीही स्थापन केली आहे. ते नेते पक्षावर नाराज आहेत अशा लोकांना देखील भाजपमध्ये आणण्याचं काम ही समिती करणार आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा तर एनडीए 400 पार होईल असे भाकीत केले होते. मोदींच्या या भाकिताला प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.
आंध्र प्रदेशात भाजपने टीडीपीला पुन्हा एनडीएमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवत भाजपने आधीच देशाचा मूड ओळखला आहे.
बिहारमध्ये एनडीए मजबूत स्थितीत आहे. उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष आरएलएसपी, चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी (रामविलास) आणि जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम यांचा भाजपला पाठिंबा मिळाला आहे. बिहारमध्ये एकूण 40 जागा आहेत. या सर्व जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात देखील भाजपने विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपने आधीच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एनडीएमध्ये सहभागी करुन घेतलं आहे. पण यानंतर आता मनसेला देखील एनडीएमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.