यूपीमध्ये समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये अनेक मोठे नेते पराभवाच्या छायेत असल्याचं समोर आले आहे. एक्झिट पोलमध्ये कोणत्या जागेवर कोणता पक्ष जिंकतोय की पराभूत होतोय याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 62 आणि सपा-काँग्रेस इंडिया आघाडीला केवळ 18 जागा मिळाल्या असल्या तरीही एनडीएचे अनेक दिग्गज आणि त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांच्या पुत्रांचा पराभव होताना दिसत आहे. एवढेच नाही तर सपाचे बलाढ्य नेते राम गोपाल यादव आणि शिवपाल यादव यांच्या मुलांचाही पराभव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपकडून पराभूत झालेल्यांमध्ये स्मृती इराणी हा सर्वात मोठा चेहरा असल्याचे बोलले जात आहे. अमेठीतून निवडणूक लढवलेल्या स्मृती इराणी यांनी गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव केला होता. पण यावेळी स्मृती यांचा काँग्रेसच्या केएल शर्माकडून पराभव होण्याची शक्यता आहे.
स्कूल ऑफ पॉलिटिक्स एजन्सीने देशातील प्रत्येक जागेचा एक्झिट पोल जाहीर केलाय. त्यांनी सर्वेक्षणात २० लाख मतदारांचा समावेश केल्याचा दावा केला आहे. या एजन्सीने उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागांवर आपला अंदाज जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी अमेठीमध्ये काँग्रेसच्या केएल शर्मा यांच्याकडून पराभूत होत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. एनडीएचे मित्रपक्ष आणि निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांचे पुत्र प्रवीण राजभर यांचा देखील पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. एनडीएचा आणखी एक सहयोगी, सुभासप प्रमुख ओपी राजभर यांचा मुलगा अरविंद राजभर यांनाही पराभव होण्याची शक्यता आहे. सपा दोन्ही जागा जिंकण्याची शक्यता आहे.
आझमगड लोकसभा मतदारसंघातून भोजपुरी स्टार आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव निरहुआ यांचा ही पराभव होण्याची शक्यता आहे. यूपीचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे पणतू ललितेश पती त्रिपाठी यांचा देखील पराभव होताना दिसत आहे. जौनपूरच्या दोन्ही जागांवर धनंजय सिंह यांची जादू चालली नाही. तर प्रतापगड आणि कौशांबी या दोन्ही ठिकाणी राजा भैय्याचे वर्चस्व दिसून आले आहे. धनंजय यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. यानंतरही भाजप जौनपूर आणि मच्छिलिशहर लोकसभा जागा गमावत आहे. राजा भैय्याच्या प्रभावाखाली असलेल्या कौशांबी आणि प्रतापगडच्या जागा सपा जिंकताना दिसत आहे.