उत्तर प्रदेशातील बलिया येथील एकाच कुटुंबातील 6 लोकांना डोळ्यांचा अनोखा आजार जडला आहे. या कुटुंबात 8 सदस्य आहेत. त्यातील चौघांना फक्त दिवसा दिसत नाही. त्यांना रात्रीचं दिसतं. तर दोघांना रात्री दिसत नाही. या दोघांना दिवसा दिसतं. या अनोख्या आजाराचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. बलिया जिल्हा रुग्णालयापासून ते दुसऱ्या राज्यातील मोठ्या डॉक्टरांना दाखवल्यानंतरही हा आजार बरा होत नाहीये. सध्या गावापासून देशभरात या अनोख्या आजाराची चर्चा सुरू आहे.
बलियाच्या हनुमान गंज ब्लॉकच्या बांसडीह रोड येथील टकरसन गावात हे कुटुंब राहतं. या गावातील राम प्रवेश पासी यांच्या कुटुंबात ही समस्या आहे. राम प्रवेश यांना एकूण सहा मुलं आहेत. त्यातील हरी पासी, रामू, भानू, जयराम यांना दिवसा दिसत नाही. रात्रीचं दिसतं. राम प्रवेश यांची पत्नी सुनीता देवींनाही हा आजार भेडसावत आहे. सुनीता देवी या अपंग आहेत. राम प्रवेश यांचे दुसरे दोन मुले सुनील आणि राज चहेलिया यांना रात्री दिसत नाही. त्यांना दिवसा दिसते.
हे अत्यंत गरीब कुटुंब आहे. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांच्याकडे पक्कं घर नाही. मातीच्या घरात हे कुटुंब राहतंय. त्यांच्याकडे रेशन कार्डही नाही. त्यामुळे त्यांना उज्ज्वला योजनासहीत कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.
जिल्ह्याचे बीडीओ सूर्य प्रकाश यांनी यावर भाष्य केलं आहे. आमच्या गावातील कुटुंबातील कुणाला असा काही आजार असेल याची आम्हाला माहिती नव्हती. या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने त्याबाबतची तक्रार केली नाही. ज्या पंचायतीच्या क्षेत्रात हे लोक राहतात, त्या ठिकाणच्या सचिवाला पीडित कुटुंबाची संपूर्ण माहिती घ्यायला सांगितलं आहे. जर या कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळत नसेल तर तो लाभ मिळवून दिला जाईल, असं सूर्य प्रकाश यांनी सांगितलं.
आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. पण काहीच फायदा झाला नाही. लहानपणापासूनच कमी दिसत होतं. आम्ही जसजसं मोठे झालो, ही समस्या अधिकच वाढली, असं या पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. या कुटुंबाचे प्रमुख राम प्रवेश पासी हे रिक्षा चालवून घराचा खर्च भागवतात. आम्ही आमच्या आजारपणाबद्दल आणि आमच्या दारिद्र्याबाबत अनेकदा विभागीय अधिकाऱ्यांना सांगितलं. पण त्यांच्याकडून आम्हाला कोणतीच मदत मिळाली नाही, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
डोळ्यांच्या या आजाराला नाइक्टालोपिया म्हणजे रातांधळेपणा असं त्याला म्हणतात. या आजारात रात्री दिसायला त्रास होऊ शकतो. या आजाराच्या लोकांना रात्री प्रखर प्रकाशात स्वच्छ दिसत नाही. तर ज्या लोकांना दिवसा दिसत नाही, त्यांच्या ग्लुकोमा किंवा ऑप्टिक नर्व्हमध्ये काही तरी समस्या असू शकते, असं नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. एके ग्रोव्हर यांनी सांगितलं. तथापि एकाच कुटुंबातील सदस्यांना ही समस्या का निर्माण झाली आहे? याबाबत काही सांगता येत नाही. अशा जेनेटिक आजाराला ऑटो इम्यून डिजिज म्हटलं जातं. हा एक संशोधनाचा विषय आहे, असंही ग्रोव्हर यांनी स्पष्ट केलं.