नवी दिल्ली | दि. 9 मार्च 2024 : सेलिब्रेटीजच नव्हे तर काही सर्वसामान्यांची लग्नही चर्चेचे विषय ठरत असतात. नुकतेच हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन लग्न चर्चेत आली आहेत. हरियाणामध्ये शेतकऱ्याच्या मुलीची सासरी पाठवणी हेलिकॉप्टरमधून झाली. हरियाणीतील रेवाडी येथील मुलीची ‘बिदाई’ पाहण्यासाठी परिसरातील जनसमूदाय आला. या लग्नाची वरात गुरुग्राम जिल्ह्यातील एका गावातून आली होती. मुलीचे वडील उदयवीर पटेल यांनी शेतीतून मुलगा आणि मुलगी यांचे शिक्षण आणि लग्न केले आहे. एक शेतकऱ्याने मुलीस हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवल्याचा आपणास आनंद आणि अभिमान असल्याचे उदयवीर पटेल यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातील एका गावात हेलिकॉप्टरने नववधू सासरी आली. तिच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या थाटात वधूचे गावात आगमन झाले होते. वधू आणि हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी बराच वेळ लोकांची गर्दी झाली होती. हेलिकॉप्टरने आलेली वधू संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ही घटना देवरिया येथील भटनी येथील प्रभाग क्रमांक सातमधील रामपूर खुर्हुरिया गावात पाहायला मिळाली. भटनी नगरमध्ये राहणारा एक मोठा रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आणि व्यापारी महेंद्र सिंहचा वकील यांचा मुलगा आशिष राज सिंह आणि बिहारच्या सिवानमध्ये राहणारी सुरभी आनंद यांचा विवाह झाला होता. हे लग्न अविस्मरणीय व्हावे, अशी कुटुंबियांची इच्छा होती.
लग्नानंतर वधूला निरोप देण्यासाठी हेलिकॉप्टर गुरुवारी सिवानमधील सुनील कुमार सिंह यांच्या घरी पोहोचले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. येथे सून हेलिकॉप्टरने सासरच्या घरी येत असल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातून मोठी गर्दी झाली. हेलिपॅडजवळ गर्दी जमली होती.
निर्धारित वेळ, सुरक्षा आणि विमान वाहतूक विभागाच्या मानकांची पूर्तता केल्यानंतर वधू-वरांना हेलिकॉप्टरने रामपूर खुर्हुरिया येथे सोडण्यात आले. यावेळी उपस्थित वधू-वरांच्या कुटुंबियांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने उड्डाण करून या परिसरात आलेल्या सुनेची जोरदार चर्चा आहे.