नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर देशातील स्टार महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. टोकिओ ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्या महिला पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात या खेळाडूंचं दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु आहे. त्यांनी केलेले आरोप भयानक असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महिला पैलवानांचे आरोप सिद्ध झाले तर गळफास घेईन, असं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं आहे.
बृजभूषण सिंह यांनी महिला पैलवानांकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. “महिला पैलवानांनी केलेले आरोप खरे ठरले तर मी फाशी घेऊन स्वत:ला लटकवून देईन”, अशी प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिलीय.
“कुस्ती संघाने त्यांचं शोषण केलं असं सांगणारा कोणता खेळाडू आहे का? त्यांना गेल्या दहा वर्षांपासून फेडरेशनपासून काहीच त्रास नाही का? या सर्व गोष्टी तेव्हा होत आहेत जेव्हा नवे नियम लागू करण्यात आले आहेत”, असा दावा बृजभूषण सिंह यांनी केला.
“धरणे आंदोलनाला बसलेल्या पैलवानांपैकी एकाही पैलवानाने ऑलम्पिकनंतर एकही राष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेला नाही. लैंगिक शोषणाची कोणतीही घटना झालेली नाही. तसं झालं असेल तर मी स्वत:गळपास लाऊन घेईन”, असं बृजभूषण सिंह म्हणाले.
“मी विनेश फोगाटला विचारु इच्छितो की, ऑलम्पिकमध्ये पराभव झाल्यानंतर कंपनीच्या लोगोचा पोशाख का परिधान केला नव्हता? तिच्या पराभवानंतर मी तिला फक्त प्रोत्साहित आणि प्रेरित केलं होतं. लैंगिक शोषणाचा आरोप खूप मोठा आहे. मलाच इथे ओढण्यात आलंय तर मी कारवाई कसा करु शकतो? मी चौकशीसाठी तयार आहे”, असं बृजभूषण सिंह म्हणाले.
“मला जेव्हा माहिती पडलं की पैलनाव धरणे आंदोलनाला बसले आहेत तर मी तातडीने फ्लाईटने दिल्लीला पोहोचलो. कुणी माझ्यासमोर सांगू शकतं का की मी लैंगिक शोषण केलंय? हे चुकीचं आहे. या प्रकरणात मुख्य कोचचं देखील नाव घेतलं गेलंय”, असं बृजभूषण म्हणाले.
“संघाने दुनियाभरातील अनेक देशांचे नियमांचा अभ्यास केल्यानंतर नियम बनवले. आम्ही ऑलम्पिक ट्रायलचा नियम बनवला. कुणाला ऑलम्पिकला जायचं असेल तर देशातील इतर खेळाडूंसोबत ट्रायल होईल. ज्या खेळाडूंनी ऑलम्पिकचा कोटा मिळवलेला असेल त्याला देशात ट्रायल जिंकणाऱ्यांसोबत खेळावं लागेल. मग तिथून ऑलम्पिकसाठी खेळायला जाणाऱ्या पैलवानाची निवड होईल”, असं बृजभूषण यांनी सांगितलं.
“ऑलम्पिकचा कोटा मिळवणाऱ्याचा पराभव झाला तर त्याला पु्न्हा एक संधी दिली जाईल. आम्ही नियमानुसार काम करत आहोत. यात तानाशाहीचा विषयच नाही. हा माझा निर्णय नाही तर चांगले कोच आणि खेळाडूंची प्रतिक्रिया ऐकूनच नियम बनवण्यात आलाय”, अशी प्रतिक्रिया बृजभूषण यांनी दिली.