G-20 Summit 2023 : G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक भारत दौऱ्यावर आले आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसोबत दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात पोहोचले. अक्षरधाम मंदिराच्या संतांनी सुनक आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. ऋषी सुनक आणि अक्षता यांनी मंदिरात जाऊन विधीनुसार पूजा केली.
सुनक आणि अक्षता यांनी मंदिरात जलाभिषेक केला. संतांनी अक्षरधाम मंदिराचे निर्माते प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या प्रतिमेवर वैदिक मंत्रांचा उच्चार केला आणि दोघांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. सुनक यांच्या कपाळावर टिळा देखील लावला. ब्रिटीश पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर रोडकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.
भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदिराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिंदू धर्माशी संबंध असल्याबद्दल त्यांनी अनेकदा म्हटले आहे. G20 शिखर परिषदेत त्यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, “मला हिंदू असल्याचा अभिमान आहे”. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
G 20 in India | United Kingdom Prime Minister Rishi Sunak and his wife Akshata Murthy at Delhi’s Akshardham temple.
(Source: Swaminarayan Akshardham’s Twitter) pic.twitter.com/I8dwecv7pk
— ANI (@ANI) September 10, 2023
G20 बैठकीला जाण्यापूर्वी सुनक यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. सुनक म्हणाले की, मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. G20 आणि भारताच्या अध्यक्षपदाबद्दल बोलताना ते म्हणाले की G20 यशस्वी करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्यास ते तयार आहेत.