चितगाव कट (chittagong rebellion) हा देशाच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान बंगालच्या चट्टग्राम शहरातील शस्त्रागारावर घातलेला छापा होता. सूर्यसेन (Surya Sen) हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते. बंड दडपण्यासाठी इंग्रजांनी (Britishers) केवळ भारतीयांवर अन्याय आणि अत्याचारच केले नाहीत तर निर्दयतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. चितगाव बंडाचे सूत्रधार क्रांतिकारक सूर्यसेन यांच्याबाबतही इंग्रजांनी क्रूरतेची मर्यादा ओलांडली होती. त्यांना वंदे मातरम् म्हणता येऊ नये म्हणून इंग्रजांनी त्यांचा जबडा तोडला, हाताची नखं उपटली. भारतमातेच्या त्या शूर सुपुत्राने सर्व अत्याचार सहन केले, पण इंग्रजांना शरण कधीच गेला नाही. फाशीच्या एक दिवस आधी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र करण्याचं आवाहनही केलं होतं. पत्रात त्यांनी लिहिलं होतं की, ते आपल्यामागे स्वातंत्र्याचं स्वप्न सोडून जात आहेत.
महान क्रांतिकारक सूर्यकुमार सेन यांचा जन्म 22 मार्च 1894 रोजी अविभाजित बंगालच्या चितगाव जिल्ह्यातील नोआपारा या गावात झाला (चितगाव आता बांगलादेशात आहे). त्यांच्या वडिलांचं नाव राजमोनी सेन होतं. ते शिक्षक होते आणि आईचं नाव शीला बाला देवी होतं. सूर्य सेन हे सुर्ज्या या नावानेही ओळखले जायचे, तर कुटुंबीय त्यांना प्रेमाने कालू या नावाने हाक मारायचे. नोआपारा इथल्या इंग्रजी शाळेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर सेन यांनी बी.ए. ची पदवी घेतली.
सूर्यसेन लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांचं पालनपोषण त्यांच्या काकांनी केलं. ते बीएचं शिक्षण घेत असताना एका शिक्षकाने त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा दिली. त्या शिक्षकांचा सूर्यसेन यांच्यावर खूप प्रभाव होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेन यांनी 1918 मध्ये चितगावच्या नंदन कानन भागातील एका शाळेत गणित शिकवण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांना मास्टर दा हे टोपणनाव मिळालं. क्रांतिकारी कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी नोकरीही सोडली होती.
सूर्यसेन हे पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्या काळातील सर्वात मोठ्या क्रांतिकारी संघटनेच्या युगांतर गटात सामील झाले होते. त्यांनी 1918 मध्ये स्थानिक तरुणांना संघटित केलं होतं. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी क्रांतिकारी उपक्रम अधिक तीव्रतेने राबवले. इंग्रजांसोबतच्या युद्धासाठी शस्त्रे आवश्यक होती जी त्यांच्याकडे नव्हती, म्हणून त्यांनी इंग्रजांशी गनिमी कावा सुरू केला. 23 डिसेंबर 1923 रोजी त्यांनी आसाम-बंगाल ट्रेजरी ऑफिस लुटलं आणि ब्रिटिशांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर इंग्रज सूर्यसेनचा शोध घेऊ लागले, पण वेळोवेळी सूर्यसेन हे इंग्रजांना चकवा देण्यात यशस्वी ठरले.
क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. स्वातंत्र्याची लाट देशभर वाढत होती. भारतीय इतिहासाचं पुस्तक ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडेंस’मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सूर्यसेन यांनी आपल्या साथीदारांसह 1930 मध्ये इंडियन रिपब्लिकन आर्मी (IRA) ची स्थापना केली. क्रांतिकारकांसोबत त्यांनी ब्रिटीश पोलिसांच्या शस्त्रागारावर हल्ला केला होता. इतिहासात या घटनेला चितगाव बंड म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर क्रांतिकारकांनी टेलिफोन एक्स्चेंजवर छापा टाकून इंग्रजांचं मोठं नुकसान केलं होतं. क्रांतिकारकांनी शस्त्रागारातून शस्त्रे लुटली, परंतु दारुगोळा हस्तगत करण्यात ते अपयशी ठरले.
चितगाव शस्त्रागार ताब्यात घेतल्यानंतर तिथं स्वराज्याचा झेंडा फडकवण्यात क्रांतिकारकांना यश आलं. या घटनेनंतर इंग्रज संतापले आणि त्यांनी सूर्यसेन आणि त्यांच्या सहा साथीदारांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं. सूर्य सेन हे अनेक दिवस लपण्यात यशस्वी ठरले, पण एके दिवशी त्यांचा साथीदार नेत्र सेनने त्यांचा विश्वासघात केला आणि इंग्रजांना सूर्य सेन यांचा पत्ता सांगितला. 16 फेब्रुवारी 1933 रोजी ब्रिटीश पोलिसांनी सूर्य सेन यांना अटक केली.
अटक झाल्यानंतर सूर्यसेन तुरुंगात वंदे मातरमच्या घोषणा देत असे. हे थांबवण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. त्यांचा जबडा तोडला, हाताची नखं उपटली. खटल्यात त्यांना अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 12 जानेवारी 1934 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.
चितगाव सेंट्रल जेलमध्ये सूर्यसेन यांना फाशी देण्यात आली होती. त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. 1978 मध्ये भारत आणि बांगलादेश सरकारने त्यांचं टपाल तिकीटही जारी केलं होतं. कोलकाता इथल्या एका मेट्रो स्टेशनचंही नाव त्यांच्या नावावर आहे.