मायावतींचं ‘मिशन ब्राह्मण’, ‘सोशल इंजीनिअरिंग’द्वारे उत्तर प्रदेशात कम बॅक करणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jul 24, 2021 | 9:50 AM

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी म्हणजे 2022मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पानीपत झाल्यानंतर बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजीनिअरिंगच्या फॉर्म्युल्याकडे मोर्चा वळवला आहे. (BSP Social Engineering)

मायावतींचं मिशन ब्राह्मण, सोशल इंजीनिअरिंगद्वारे उत्तर प्रदेशात कम बॅक करणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट
mayawati
Follow us on

लखनऊ: उत्तर प्रदेशात पुढील वर्षी म्हणजे 2022मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पानीपत झाल्यानंतर बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजीनिअरिंगच्या फॉर्म्युल्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यासाठी त्यांनी आता ब्राह्मण मतदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांचाच एक भाग म्हणून त्यांनी काल ब्राह्मण संमेलनही घेतलं. ही संमेलनं आणखी होणार आहेत. 2022साठीची मायावती यांची नेमकी रणनीती काय आहे? त्याचा घेतलेला हा आढावा. (BSP revives 2007 Dalit-Brahmin formula, read special story)

सतीश चंद्र मिश्रा कामला लागले

बसपाला 2007मध्ये प्रचंड विजय मिळाला होता. सोशल इंजीनिअरिंगच्या माध्यमातून त्यांना हा विजय मिळाला होता. आता 2022च्या विधानसभा निवडणुकीत हाच फॉर्म्युला अंमलात आणण्याचा बसपाचा प्रयत्न आहे. दलित आणि ब्राह्मणांची मते एकत्र करण्याचा हा फॉर्म्युला आहे. एकेकाळी “तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार” अशी घोषणा देणाऱ्या मायावती यांनी 2007मध्ये दलित आणि ब्राह्मणांची मोट बांधून सत्तेचं सोपान सर केलं होतं. अर्थात ही सोशल इंजीनिअरिंग घडवून आणण्यात बसपा नेते आणि मायावतींचे विश्वासू सतीश चंद्र मिश्रा यांचा मोठा हात होता. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मिश्रा कामाला लागले आहेत. मायावती यांनी पुन्हा एकदा या सोशल इंजीनिअरिंगची जबाबदारी मिश्रा यांच्याकडे सोपवली आहे. काल त्याची सुरुवात आयोध्येतून झाली आहे. प्रबुद्ध वर्ग संवाद, सुरक्षा आणि सन्मान विचार मंथनच्या माध्यमातून ब्राह्मणांशी संवाद साधला जात आहे. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यात ही परिषद होणार आहे. विशेष म्हणजे आता बसपाच्या बॅनरवर श्रीराम आणि परशुरामाचे फोटोही दिसत आहेत. तसेच सर्व परिषदांची सुरुवात शंखनाद आणि मंत्रोच्चाराने होत आहे.

2007मध्ये काय होती सोशल इंजीनिअरिंग?

2007मध्ये बसपाने 86 जागेवर ब्राह्मण उमेदवार दिले होते. त्यापैकी 41 जागांवर बसपाला विजय मिळाला होता. विशेष म्हणजे निवडणुकीच्या एक वर्ष आधीच मायावती यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे या उमेदवारांना आपल्या मतदारसंघात काम करण्यास भरपूर संधी मिळाली होती. 2007मध्ये काही राजकीय पंडितांनी ही सोशल इंजीनिअरिंग यशस्वी होणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, निवडणूक निकालानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 403 पैकी 206 जागांवर बसपाने विजय मिळवून स्वबळावर सत्ता काबीज केली होती. त्यामुळे मायावती मुख्यमंत्री बनल्या होत्या.

भाजपच्या सोशल इंजीनिअरिंगपुढे सर्व फेल

बसपाच्या या सोशल इंजीनिअरिंगचा नंतर सर्वांनीच वापर केला. ब्राह्मण मतदार ज्या संख्येने इतर पक्षांना जाऊन मिळाले, त्याच प्रमाणात या पक्षांना यशही मिळालं. 2012मध्ये समाजवादी पार्टीनेही ब्राह्मणांची साथ घेतली होती. या निवडणुकीत सपाने 21 ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिलं होतं. तर 2017च्या निवडणुकीत भाजपने सवर्णांसह जाटव दलित आणइ बिगर यादव ओबीसींना तिकीट देऊन सशक्त सोशल इंजीनिअरिंग निर्माण केली. भाजपच्या या फॉर्म्युल्याचा प्रभाव प्रचंड दिसून आला. या प्रयोगामुळे भाजपने 403 पैकी 325 जागा जिंकल्या होत्या. तब्बल दीड दशकानंतर भाजपने उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताचं सरकार बनवलं होतं. या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 46 ब्राह्मण उमेदवार निवडून आले होते. यावरून गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा ट्रेंड पाहता ब्राह्मण मतदार ज्यांच्या बाजूने झुकला त्याची राज्यात सत्ता आली. त्यामुळेच बसपा आणि सपामध्ये परशुरामाची मूर्ती उभारण्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, भाजपने सवर्ण मते आपलीच व्होट बँक असल्याचं समजून दलित मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर स्मारके उभारण्यास सुरुवात केली आहे.

ब्राह्मणांची संख्या 12-13 टक्के

उत्तर प्रदेशात ब्राह्मणांची संख्या 12-13 टक्के आहे. काही विधानसभा मतदारसंघात हा आकडा 20 टक्के आहे. त्यामुळे राज्यात ब्राह्मण मतदार निर्णायक आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील बुलंदशहर, हाथरस, अलिगड, मेरठसह पूर्वांचल आणि लखनऊमध्ये ब्राह्मण मतदार सर्वाधिक आहेत. या मतदारसंघात कुणाला जिंकवायचे आणि कुणाला नाही हे ब्राह्मण मतदार ठरवत असतात.

2017मध्ये भाजपला ब्राह्मणांची 70 टक्के मते

2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ब्राह्मणांची 70 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे भाजपला राज्यात घवघवीत यश मिळालं होतं. केवळ विधानसभेलाच नाही तर 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला ब्राह्मण मतदारांनी मतांचं भरभरून दान केलं होतं. त्याशिवाय बसपाच्या जाटव दलित आणि सपाच्या यादव ओबीसी मतांनाही भाजपने सुरुंग लावला होता. (BSP revives 2007 Dalit-Brahmin formula, read special story)

 

संबंधित बातम्या:

BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

Video: राजीव सातवांचं काय वय होतं ह्या जगातून जाण्याचं? आरजेडीच्या खासदारांचं देशभर चर्चेत असलेलं भाषण ऐकलंत?

मोहन भागवत म्हणतात, सर्व भारतीयांचा DNA एकच; मुसलमानांना सीएएवर आक्षेप नाही

(BSP revives 2007 Dalit-Brahmin formula, read special story)