डेहराडून | 21 ऑगस्ट 2023 : उत्तराखंडमध्ये रविवारी रात्री अत्यंत मोठा आणि भीषण अपघात झाला आहे. उत्तरकाशी-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ एक बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले आहेत. तर 26 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी 26 प्रवाशांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एक प्रवासी अजूनही अडकलं आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व श्रद्धाळून गंगोत्री धामहून येत असताना हा अपघात झाला. सर्व भाविक गुजरातचे असल्याचं सांगितलं जात आहे.
गुजरातहून हे सर्व भाविक आले होते. बसमध्ये एकूण 33 भाविक होते. संध्याकाळी ही बस उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावरील गंगनानीजवळ हा भीषण अपघात झाला. काल रात्री 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रात्रीची वेळ असल्याने दरीत बचावकार्य करताना अडचणी येत होत्या. मात्र एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं. या अपघातातील 26 जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अजूनही या परिसरात बचावकार्य सुरू आहे. एक व्यक्ती बसमध्ये अत्यंत विचित्र पद्धतीने अडकला आहे. त्याला बाहेर काढण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे.
दरम्यान, उत्तराखंड प्रशासनाने एक हेल्पनंबर जारी केला आहे. त्यावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 0134 222722, 222126 आणि 7500337269 नंबरवरून कॉल करून जखमींची माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आंध्रप्रदेशाच्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील पाडेरू परिसरात प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बस 100 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील 10 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या ठिकाणीही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही बस छोडवाराम येथून पाडेरूला जात असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं.
दोन दिवसांपूर्वी लडाख येथेही जवानांचा एक ट्रक दरीत कोसळला. या अपघातात ज्युनिअर कमिशन ऑफिसरसहीत आठ जवान शहीद झाले. या अपघातात एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. लडाखमधील क्यारी परिसरात ही मोठी दुर्घटना घडली.