लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत. जगभरात मोदींच्या विजयाची चर्चा आहे. जागा कमी जिंकल्या असल्या तरी मित्रपक्षाच्या मदतीने पंतप्रधान मोदी सरकार स्थापन करणार आहेत. मोदींच्या विजयाचा डंका भारतातच नाही तर विदेशात ही आहे. कारण पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन व्यावसायिकाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेच्या शांततापूर्ण आणि यशस्वी वर्तनाबद्दल भारतीय जनतेचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानी व्यावसायिकाने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील स्थिरतेची हमी आहेत.
पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी नेहमीच म्हटलंय की, भविष्यात भारताच्या स्थैर्यासाठी मोदींचे नेतृत्व आवश्यक आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक पक्षांना येण्यापासून आणि संविधानाला अस्थिर करण्यापासून रोखता येऊ शकते. मोदींचे नेतृत्व ही भारताची स्थिरता आणि भारताचे भविष्य याची हमी आहे.
पुढे ते म्हणाले की, मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेच्या मनात एक आशेचा किरण आहे की त्यांचे भारतासोबत संबंध सुधारु शकतील. एका प्रश्नाला उत्तर देताना तरार म्हणाले की, ‘मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ उपस्थित राहतील अशी मला आशा आहे. पण त्यांच्याकडून अद्याप मोदींचं अभिनंदत करणारा संदेश आलेला नाही ही निराशाजनक बाब आहे.’
ते म्हणाले, “मोदी केवळ भारतासाठीच नाही तर पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर इस्लामविरोधी आणि पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप हा राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मोदींच्या येण्याने जर पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारले तर दोन दक्षिण आशियाई देशांमधील व्यापार वाढेल.
“मोदी हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी आता ब्रिक्स आणि जी-20 सारख्या विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर काम केले आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले, “ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्य आणि लवचिकतेचा दाखला आहे.” भारताच्या लोकशाही प्रक्रियेच्या ताकदीवर शंका घेणाऱ्या लोकांना या निवडणुकीने शांत केले आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “भारताची लोकशाही मजबूत आहे, अमेरिकेपेक्षाही मजबूत आहे,”