नवी दिल्ली : भारत सरकारच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडाने गुडघे टेकले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यावरुन जस्टिन ट्रूडो सरकारने भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. भारताचा या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे भारत-कॅनडामधील संबंध प्रचंड ताणले गेले. भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा बंदी केली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला. भारत-कॅनडामधील व्यापारी संबंधांवर या तणावाचा परिणाम होणार आहे. भारतातील काही उद्योजकांनी कॅनडामधील गुंतवणूक काढून घेतली. भारत सरकारने एकाचवेळी अनेक आघाड्यांवरुन हल्लाबोल केला. त्यामुळे कॅनडा सरकार चांगलच जेरीस आलय.
कॅनडातील जस्टिन ट्रूडो सरकार आता पूर्णपणे बॅकफूटवर आहे. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले आहेत. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. “भारताशिवाय इंडो-पॅसिफिकची रणनिती अपूर्ण आहे. कारण भारतामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मजबुती मिळते. निज्जरच्या हत्येचा तपास सुरु राहील. पण त्याचवेळी इंडो-पॅसिफिक रणनीती करारावर काम सुरु राहील. भारतासोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पण कायद्याच आणि आपल्या नागरिकांच रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे” असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. इंडो-पॅसिफिक रणनीती आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं ब्लेयर यांनी सांगितलं.
उलट भारतावरच आरोप
कॅनडामध्ये खलिस्तानची मागणी करणाऱ्यांना बळ दिलं जातं. तिथल्या भूमीवरुन भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालतात. कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. या खलिस्तान स्रमर्थकांवर कारवाई करावी अशी भारत सरकारची मागणी आहे. पण कॅनडातील सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी उलट भारतावरच आरोप करतय.