नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : पाकिस्तानच्या चिथावणीवरुन भारताविरोधात कारवाया करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाली. त्याची कड घेत कॅनडाचे पंतप्रधान भारताविरोधात गरळ ओकत आहेत. निज्जर हा कॅनडाचा नागरीक असल्याचा कांगावा करत भारताने ही हत्या घडवल्याचा आरोप पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांनी केला आहे. भारताने त्याला खरमरीत उत्तर दिले आहे. दोन्ही देशातील संबंध टोकाचे झाले आहेत. कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी (Khalistan Terrorist) उघड उघड भारतीयांना देश सोडून जाण्याच्या धमक्या देत आहेत. पण ट्रूडो मूग गिळून आहेत. आता एका यादीमुळे ट्रूडोचा कांगावा आणि कावेबाजपणा उघड झाला आहे.
निज्जरची हत्या
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो मुळचा पंजाब राज्यातील आहे. जालिंधर जवळ त्याचे गाव आहे. हिंदू पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) सक्रीय झाल्यानंतर तो कॅनडात पळाला. ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वारासमोर त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. 18 जून 2023 रोजी तो मारल्या गेला.
हे आहेत दहशतवादी
दहशतवाद्यांची यादी सोपवली
आता निज्जरच्या नावाने गळा काढणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधान ट्रूडो यांना एका यादीचा विसर पडला आहे. 2018 मध्ये ट्रूडो हे भारत दौऱ्यावर आले होते. अमृतसर येथे पंजाब सरकारने त्यांना देशविघातक कार्य करणाऱ्या दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. त्यात हरदीप सिंग निज्जर याच्यासह गुरजीत सिंग चिम्मा, गुरप्रीत सिंग, गुरजिंदर सिंग पन्नू, मलकीत सिंग उर्फ फौजी, परविकर सिंग दुलाई, भगत सिंग ब्रार, तेहल सिंग, सुलिंदर सिंग, हरदीप सोहोटा या दहशतवाद्यांचा पण यादीत समावेश असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.