नवी दिल्ली : मोबाईल हा आपल्या आयुष्यातला सध्याच्या घडीला अविभाज्य घटक बनला आहे. आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मोबाईल हे संवादाचं अतिशय सोपं, योयिस्कर आणि कमी खर्चिक असं माध्यम आहे. पण सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉल आपल्याला येतात. त्या स्पॅम कॉलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे.
सरकारचा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. विशेषत: यामुळे क्राईम करणाऱ्यांचे धाबे दणाणतील. कारण मोबाईलच्या माध्यमातून Unkonwn नंबरवरुन फोन करणाऱ्याची माहिती सहज पोलिसांना उपलब्ध होण्यास मदत होईल.
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, कॉल करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसेल. सिम कार्ड विकत घेताना फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असणार, त्या व्यक्तीचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल, असं दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आलंय.
विशेष म्हणजे दूरसंचार विभागाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना कोणत्याही ॲप शिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येईल, ज्यामुळे कॉल उचलणारी व्यक्तीदेखील आपण काय किंवा कसं बोलावं याबाबत सावध होईल.