केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, प्रजासत्ताक दिनी ‘या’ दिग्गजांना सन्मान

| Updated on: Jan 26, 2024 | 12:17 AM

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी सरकारकडून 5 दिग्गजांसाठी पद्मविभूषण, 17 दिग्गजांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, प्रजासत्ताक दिनी या दिग्गजांना सन्मान
Follow us on

नवी दिल्ली | 25 जानेवारी 2024 : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी सरकारकडून 5 दिग्गजांसाठी पद्मविभूषण, 17 दिग्गजांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. देशाच्या माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. केंद्र सरकारकडून माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगणा पद्मा सुब्रमण्यम, अभिनेता चिरंजीवी आणि सुलभ शौचालयाचे फाउंडर बिंदेश्वर पाठक यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने ज्या 17 दिग्गजांना पद्म भूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (मरणोत्तर) यांचाही समावेश आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, अभिनेता मिथून चक्रवर्ती, तायवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे चेअरमन यंग लिउ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. उद्योगपती सीताराम जिंदल, वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट अश्विन बालचंद मेहता, माजी केंद्रीय मंत्री सत्यव्रत मुखर्जी, संगीतकार प्यारेलाल शर्मा, पॉप म्युजिक क्वीन उषा उत्थुप, अभिनेता विजयकांत आणि माजी राज्यसभा खासदार ओलानचेरी राजगोपाल यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून चामी मुर्मू, आदिवासी कल्याण कार्यकर्ता जोगेश्वर यादव, दुखू माझी, हेमचंद माझी, सामाजिक कार्यकर्ता संगथंकिमा आणि गुरविंदर सिंह यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्र सरकारने एकूण 132 दिग्गजांसाठी पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. कला, साहित्य, शिक्षण, खेळ, आरोग्य, समाजसेवा, विज्ञान, इंजीनियरिंग, सिव्हील सेवा, व्यापार, उद्योग यांसह विविध क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं.