नवी दिल्ली : डीएमके नेते उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबद्दल टिप्पणी केली. त्यावरुन वाद सुरु आहे. तो अजून थांबलेला नाही. डीएमके हा नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस प्रणीत INDIA आघाडीतील घटक पक्ष आहे. आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या वादावर आपल मत मांडलं आहे. “जो पर्यंत भक्त जिवंत आहेत, तो पर्यंत कोणी धर्माला आव्हान देऊ शकत नाही” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. उदयनिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टालिन यांचे पुत्र आहेत. एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी यांना सनातन धर्म संपवण्याच वक्तव्य केलं होतं. राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. “जो पर्यंत भक्त जिवंत आहेत, तो पर्यंत कोणी त्यांच्या धर्माला आव्हान देऊ शकत नाही. जे लोक सनातन धर्माला आव्हान देत आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोहोचल पाहिजे” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
आस्था आणि श्रद्धेशी संबंधित विषयांवर कोणी टीका-टिप्पणी करत असेल, तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर द्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलं आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी इंडिया आघाडीचे नेते उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “इंडिया आघाडी सनातन धर्माचा अपमान करत आहे. डीएमके आणि काँग्रेस नेते फक्त मतपेटीच्या राजकारणासाठी सनातन धर्म संपवण्याची भाषा करत आहेत. आमच्या सनातन धर्माचा अपमान होण्याची ही पहिली वेळ नाहीय” असं अमित शाह म्हणाले.
उदयनिधी स्टालिन याने काय वक्तव्य केलेलं?
“काही गोष्टी अशा असतात, ज्यांचा विरोध होऊ शकत नाही, ज्या पूर्णपण संपवण्याची गरज असते. आपण डेंग्यु, मलेरिया आणि कोरोनाला विरोध करु शकत नाही. आपल्याला या मच्छरांना संपवावच लागेल. तसच आपल्याला सनातनला संपवाव लागेल. सनातनला विरोध करण्याऐवजी संपवलच पाहिजे” असं उदयनिधी स्टालिन म्हणाले होते. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियंक खर्गेने सनातन धर्माची तुलना आजाराशी केली होती. भाजपाने या दोन्ही वक्तव्याचा समाचार घेतला आहे. उदयनिधी आणि प्रियंक खर्गेला कडाडून विरोध केला आहे.