पंजाबमध्ये केजरीवालांचा भाजप-काँग्रेसला झटका, भाजपचा मेयरपदाचा उमेदवार चारीमुंड्याचीत, विधानसभेतही हेच घडणार?

| Updated on: Dec 27, 2021 | 3:16 PM

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असतानाच काँग्रेस आणि भाजपला मात्र मोठा झटका बसला आहे. चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस-भाजपला मोठा धक्का दिला आहे.

पंजाबमध्ये केजरीवालांचा भाजप-काँग्रेसला झटका, भाजपचा मेयरपदाचा उमेदवार चारीमुंड्याचीत, विधानसभेतही हेच घडणार?
Chandigarh Municipal Corporation Election
Follow us on

चंदीगड: पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असतानाच काँग्रेस आणि भाजपला मात्र मोठा झटका बसला आहे. चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस-भाजपला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे चंदीगड महापालिकेतील भाजपची सत्ता खेचून आणण्यात आपला यश मिळालं आहे. त्यामुळे सर्वच प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत.

चंदीगड महापालिकेसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. पालिकेच्या 35 जागांसाठी 203 उमेदवार रिंगणात होते. आज या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत 14 जागा जिंकून आप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपने 12 जागा जिंकल्या आहेत. या जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ 8 आणि अकाली दलाला एकच जागा मिळाली आहे.

सर्वात मोठा पक्ष, पण…

आपने या निवडणुकीत 14 जागा जिंकल्या आहेत. मात्र, महापौरपदासाठीचं 18 नगरसेवकांचं संख्याबळ त्यांना मिळू शकलं नाही. त्यामुळे आपला काँग्रेसशी युती करण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही.

भाजप सत्तेतून बाहेर

चंदीगड महापालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र, आपने भाजपला सत्तेतून बाहेर घालवलं आहे. एवढंच नव्हे तर भाजपच्या महापौराचाच आपने पराभव केला आहे. महापौर आणि भाजपचे उमेदवार रविकांत हे वॉर्ड क्रमांक 17 मधून लढले होते. त्यांना आपच्या उमेदवाराने 828 मताने पराभूत केलं आहे. इतकच नाही तर चंदीगड भाजपचे अध्यक्ष अरुण सूद यांना सुद्धा स्वत:ची सीट गमवावी लागली आहे. सूद यांनी त्यांच्या वॉर्डातून भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय राणा यांना तिकीट दिलं होतं. त्यांनाही आपने पराभूत केलं आहे. तसेच भाजपचे माजी महापौर राजेश कालिया यांना काँग्रेसचे उमेदवार जतिंदर कुमार यांनी 1440 मतांनी पराभूत केलं आहे.

सेमी फायनलमध्ये आपचा बोलबोला

चंदीगड महापालिकेची निवडणूक ही विधानसभेची सेमी फायनल समजली जाते. या निवडणुकीत आपने भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये भाजप विरोधात जनमत असल्याचं बोललं जात आहे. पंजाबमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात जन आंदोलन उभारलं होतं. त्यामुळे चंदीगडमध्ये भाजपला मोठा फटका बसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

पाच राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचा सस्पेन्स कायम; निवडणूक आयोगाने आरोग्य विभागाकडून मागवला अहवाल

बिलाच्या सुतावरून गाठला 257 कोटींचा स्वर्ग; तळघरात माया, त्याच्या 500 चाव्या, अत्तर व्यापाऱ्याच्या कारनाम्याचा दरवळ

अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!