नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : यावर्षी 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 लॉन्च करण्यात आलं होतं. तेव्हा भारताचं चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल असा देशातील 140 कोटी जनतेला विश्वास होता. भारत अंतराळातील महाशक्ती बनेल हा विश्वासही होता. भारतही इतिहास घडवू शकतो, याचाही विश्वास होता. तब्बल 40 दिवसानंतर म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताची ही आकांक्षा पूर्ण झाली. भारतानेच चंद्रावर पाऊल ठेवलं आणि जगात एक इतिहास रचला गेला.
चंद्रावर चांद्रयान-3ची सॉफ्ट लँडिंग झाली. त्यामुळे भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. भारताने आपली अंतराळातील ताकद दाखवून दिली. तसचे दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहासही रचला. भारताच्या चांद्रयान -3 चे लँडर दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत चौथा देश बनला आहे. या आधी रशिया, चीन आणि अमेरिकेने हे यश मिळवलं आहे.
यापूर्वी 2019मध्ये इस्रोने चंद्रयान-2 ला चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण चांद्रयान -2 दक्षिण ध्रुवावर उतरू शकलं नाही. पण तेव्हा हार्ड लँडिंग झाली होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केवळ भारतच नव्हे तर चीन आणि अमेरिकेसहीत जगातील अनेक देशांच्या नजरा आहेत. चीनने काही वर्षापूर्वी दक्षिण ध्रुवापासून काही अंतरावर लँडर उतरवलंही होतं. एवढेच नव्हे तर अमेरिका पुढच्या वर्षी दक्षिण ध्रुवावर काही अंतराळ मानवांना पाठवण्याची तयारीही करत आहे.
पृथ्वीचा जसा दक्षिण ध्रुव आहे. तसाच चंद्राचाही आहे. पृथ्वीचा दक्षिण ध्रुव अंटार्कटिकामध्ये आहे. हा पृथ्वीवरील सर्वात थंड परिसर आहे. तसाच चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे. तोही तिथला सर्वात थंड प्रदेश आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर कोणी अंतराळ मानव उभा राहिला तर त्याची सूर्याच्या क्षितिजाच्या रेषेवर नजर जाईल. तो चमकताना दिसेल.
दक्षिण ध्रुवावरील अधिकाधिक भागावर अंधार असतो. कारण सूर्याची किरणे तिरपी आहेत. त्यामुळे या भागात तापमान कमी असतं.
या भागात 15 दिवस अंधार आणि 15 दिवस उजेड असतो. सातत्याने या भागात अंधार असल्याने येथील तापमान कमी आहे. त्यामुळे या भागात पाणी आणि खनिज असू शकतात. आधीच्या मून मिशनमुळे ते सिद्ध झालं आहे.
ऑर्बिटरांमधील परीक्षणांच्या आधारे असं सांगितलं जातं की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आजूबाजूला बर्फ आणि दुसरे नैसर्गिक साधने असू शकतात, असं नासाचं म्हणणं आहे. मात्र, या भागातील आणखी माहिती मिळवणं आवश्यक आहे.
1998मध्ये नासाच्या मून मिशनने दक्षिण ध्रुवाच्या जवळ हायड्रोजन असल्याचा शोध लावला होता. हायड्रोजन असणे हा तिथे बर्फ असण्याचा पुरावा असल्याचं नासाने म्हटलं होतं.
नासाच्या म्हणण्यानुसा, दक्षिण ध्रुवावर मोठमोठे डोंगर आहेत. अनेक खड्डे आहेत. या भागात सूर्य प्रकाश फार कमी येतो.
ज्या भागात सूर्य प्रकाश येतो तिथलं तापमान 54 डिग्री सेल्सिअस आहे. ज्या ठिकाणी सूर्य प्रकाश पडत नाही, तिथलं तापमान 248 डिग्री सेल्सिअस आहे. येथील अनेक क्रेअटर्स हे अब्जावधी वर्षापासून अंधारातच आहे. या ठिकाणी कधी सूर्यप्रकाश आलाच नाही.
मात्र, याचा अर्थ असा नाही की संपूर्ण दक्षिण ध्रुवावर अंधार आहे. दक्षिण ध्रुवाच्या अनेक भागात सूर्य प्रकाशही असतो. शेकलटन क्रेटरच्या जवळ तर वर्षाचे 200 दिवस सूर्य प्रकाश असतो.
चांद्रयान-3 लँडर ज्या ठिकाणी उतरलं आहे. तिथे 15 दिवस सूर्य प्रकाश असेल. तर 15 दिवस अंधार असेल. 23 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी सूर्य प्रकाश होता. त्यामुळेच 23 ऑगस्ट रोजी तिथे लँडर उतरवण्यात आलं आहे. मात्र, 15 दिवसानंतर या परिसरात पुन्हा अंधार होईल.