नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : चांद्रयान-3 अवघ्या काही तासातच चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. त्यासाठीचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. भारताचंच नव्हे तर जगाचं भारताच्या या मिशन मूनकडे लक्ष लागलं आहे. बलाढ्य रशियाचं मिशन मून फेल गेल्यानंतर भारत इतिहास घडवतोय का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. इसरोनेही एक नवीन व्हिडीओ पोस्ट करून या मिशनबाबतची उत्सुकता वाढवली आहे. मिशन निर्धारीत वेळतच पूर्ण होणार असल्याचं इसरोने म्हटलं आहे.
इसरोने रविवारी महत्त्वाची बातमी दिली. चांद्रयान-3ची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग ठरलेल्या वेळेत होणार आहे. भारतीय विज्ञान, इंजीनिअरिंग, औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. अंतराळातील भारताच्या प्रगतीचं हे प्रतिक असेल. मिशन वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे सिस्टिमची वारंवार पाहणी केली जात आहे. तसेच या मिशनमध्ये भाग घेणारी लोक अत्यंत उत्साहाने काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाखणण्यासारखा आहे, असं इसरोने म्हटलं आहे.
चांद्रयान-3 आज बुधवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार. त्यामुळे संपूर्ण देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे सॉफ्ट लँडिंग याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशवासिय उत्सुक आहेत. चांद्रयान 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटाने चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याचं इसरोने सांगितलं.
पहिला टप्पा – या टप्प्यात यानाची लेव्हलपासून 30 किलोमीटरचे अंतर कमी करून 7.5 किलोमीटरपर्यंत आणले जाईल.
दुसरा टप्पा – चंद्राच्या पृष्ठभागापासून ते चांद्रयानाचं अंतर 6.8 मीटर पर्यंतचं असेल. या टप्प्यापर्यंत यानाचा वेग 350 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे सुरुवात साडेचार पट कमी असेल.
तिसरा टप्पा – यात यानाला चंद्राच्या पृष्ठभागापासून 800 मीटर उंचीवर नेलं जाईल. इथे दोन थ्रस्टर इंजिन उतरवले जातील. या टप्प्यात यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या जवळ नेला जाईल.
चौथा टप्पा – या टप्प्यात यानाला पृष्ठभागाच्या 150 मीटरपर्यंत आणलं जाणार आहे. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात. म्हणजे उभी लँडिंग होईल.
पाचवा टप्पा – या टप्प्यात यानाला लागलेल्या सेंसर आणि कॅमेऱ्यातून मिळणारे लाइव्ह इनपूट आधी स्टोअर केलेल्या रेफरन्स डेटाशी जुळवले जातील. या डेटामध्ये 3900 फोटो आहेत. हे फोटो चांद्रयान 3 उतरण्याच्या ठिकाणाचे आहेत. या फोटोवरून यानाला थेट चंद्रावर कुठे उतरवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे. यान उतरवण्याची जागा योग्य वाटली नाही तर यान उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवलं जाईल. या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभूमीच्या 60 मीटरपर्यंत जवळ नेलं जाईल.
सहावा टप्पा – हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात लँडरला थेट चंद्रावर उतरवलं जाणार आहे.
या अत्यंत ऐतिहासिक घटनेचं थेट प्रसारण आज होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटापासून हे प्रक्षेपण होणार आहे.
सॉफ्ट लँडिंगचं थेट प्रसारण इसरोची वेबसाईटवर पाहता येईल. याशिवाय इसरोचं युट्यूब चॅनल, फेसबुक पेजवरही पाहता येईल. त्याशिवाय डीडी नॅशनल टीव्हीसह टीव्ही9 मराठी, टीव्ही9 हिंदीवरही लाइव्ह प्रसारण पाहता येणार आहे.