नवी दिल्ली : देशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मिशन चांद्रयान-3 ने गुरुवारी आपल्या लक्ष्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. काल दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी चांद्रयान-3 च प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल वेगळे झाले. चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 3 च दोन भागांमध्ये विभाजन झालं. या प्रोसेसनंतर मिशनमधील एक महत्त्वाचा टप्पा सुरु झाला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणार आहे. 23 ऑगस्टला लँडिंगची ही प्रोसेस होईल. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, ही मॅचची अंतिम ओव्हर आहे.
चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर चंद्राच्या जवळच्या कक्षेत आहे. हळू-हळू लँडिंगच्या दिशेने प्रोसेस सुरु आहे. विक्रम लँडरच्या आत प्रज्ञान रोव्हर आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर प्रज्ञान रोव्हर आपलं संशोधन सुरु करेल. सगळं काही ठरवल्यानुसार, जुळून आलं तर 23 ऑगस्टला संध्याकाळी 5.47 मिनिटांनी लँडिंग होईल.
चांद्रयान 1 मिशनचे प्रमुख काय म्हणाले?
चांद्रयान 3 मिशनमधील या टप्प्याबद्दल चांद्रयान 1 मिशनचे प्रमुख एम. अन्नादुरई म्हणाले की, “खरी मॅच आता सुरु झाली आहे. ही लास्ट ओव्हर असून खूप महत्त्वाची आहे. 17 ऑगस्टला जी प्रोसेस झाली,ती खूप महत्त्वाची होती. लँडर कसं प्रदर्शन करतो, त्यावर नजर ठेवावी लागेल. कारण लँडरच आता चंद्रावर उतरणार आहे. हळू-हळू कमांड दिल्या जातील”
आज विक्रम लँडरला कुठे स्थापित करणार?
विक्रम लँडर आता चंद्रापासून 150 किमीच्या कक्षेत आहे. सध्या अंडाकार वर्तुळात भ्रमण सुरु आहे. 18 ऑगस्टच्या संध्याकाळी 4 वाजता थ्रस्टर्सच्या माध्यमातून विक्रम लँडरची गती कमी करुन चंद्राच्या लोअर ऑर्बिटमध्ये म्हणजे खालच्या कक्षेत स्थापित केलं जाईल. 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान ही प्रोसेस होईल. आधी विक्रम लँडरला चंद्रपासून 100 किमी अंतरावर आणलं जाईल. त्यानंतर चंद्राच्या 30 किमीच्या कक्षेत आल्यानंतर 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंगची प्रोसेस सुरु होईल.
तेच मिशन आता पूर्ण करायचय
600 कोटी बजेट असलेल्या चांद्रयान-3 च मागच्या महिन्यात 14 जुलैला लॉन्चिंग झालं होतं. महिन्याभरापेक्षा जास्त प्रवास करुन चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचलं आहे. भारताने याआधी 2019 साली चांद्रयान-2 लॉन्च केलं होतं. सॉफ्ट लँडिंगच्या अखेरच्या टप्प्यात गडबड झाली होती. क्रॅश लँडिंग झालं होतं. तेच मिशन आता पूर्ण करायचं आहे.