बंगळुरु : चंद्राच्या पुष्ठभागावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगला आता काही तासांचा कालावधी उरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आज लँडर मॉड्युल उतरणार, त्या क्षणाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. इस्रोच्या संचालकांनी लँडिंगचे जे अखेरचे क्षण असतील, त्याचं ’17 मिनिट्स ऑफ टेरर’ असं वर्णन केलं आहे. भारताच महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 च चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण सुरु आहे. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीला स्पर्श करेल. 5.47 पासून सुरु होणारा तो कालावधी समस्त भारतीयांसाठी टेन्शन वाढवणारा असेल.
“23 ऑगस्टला विक्रम लँडर चंद्राच्या पुष्ठभागापासून 30 किमी अंतरावरुन लँडिंगचा प्रयत्न करेल. लँडिंगच्यावेळी प्रतिसेकंद 1.68 किमी यानाची गती असेल. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती यानाला आपल्याकडे खेचेल” असं निलेश एम देसाई यांनी सांगितलं. ते इस्रोच्या स्पेस एपिलेक्शन सेंटरचे डायरेक्टर आहेत.
यानाची गती कशी कमी करणार?
“थ्रस्टर इंजिनद्वारे यानाची गती कमी केली जाईल. लँडिंगच्यावेळी वेग शुन्यापर्यंत नेण्यात येईल. लँडर मॉड्युलमध्ये चार थ्रस्टर इंजिन आहेत. 30 किमीवरुन यान 7.5 किमी आणि त्यानंतर 6.8 किमीवर आणण्यात येईल” असं देसाई यांनी सांगितलं.
लँडर जागा कशी निवडणार?
“लँडिंग प्रोसेसमध्ये चार पैकी दोन इंजिन नंतर बंद करण्यात येतील. अन्य दोन इंजिन्सचा लँडिंगसाठी वापर केला जाईल. 30 किमीवरुन लँडरचा स्पीड चारपटीने कमी करण्यात येईल. यान 6.8 किमी उंचाीवर असताना स्पीड प्रति सेकंद 350 मीटर असेल” असं देसाई यांनी सांगितलं. “या सगळ्या प्रोसेसमध्ये हॉरिझोंटल म्हणजे आडव्या असलेल्या लँडरला सरळ व्हर्टिकल करण्याच शास्त्रज्ञांसमोर मोठ आव्हान असेल. कॅमेरा आणि सेन्सर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लँडर लँडिंगसाठी जागा निवडेल” असं निलेश एम देसाई यांनी सांगितलं.
लँडिंगसाठी दुसरी जागा निवडली, तर वेळ किती वाढेल?
“ही सगळी प्रोसेस 17 मिनिट 21 सेकंदांची असेल. लँडरने थोडं बाजूला जाऊन दुसरी जागा निवडणार असेल तर 17 मिनिट 32 सेकंदांचा वेळ लागेल. ही 17 मिनिट टेररप्रमाणे म्हणजे खूप कठीण असतील. इथे कुठल्याही छोट्याशा चुकीला वाव नसेल” असं देसाई यांनी सांगितलं.