मुंबई : भारताला मोजक्या काही देशांच्या पंक्तीत बसविणारी इस्रोची ( ISRO ) महत्वाकांक्षी मोहीम चंद्रयान-3 ( Chandrayaan-3 ) चे काऊंट डाऊन सुरु झाली आहे. साऱ्या जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले. उद्या दुपारी 2.35 वाजता आंध्रातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-३ अजस्र अशा रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजल्यापासून खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन चांद्रयान-3 मोहीमेचे लाईव्ह इव्हेंट पाहता येऊ शकणार आहे. याशिवाय चंद्रयान-3 यासंबंधी लाईव्ह अपडेट देखील टीव्ही नाईन मराठी वेबसाईटवर पाहाता येऊ शकणार आहेत.
चांद्रयान-3 मोहिम साठी इस्रोच्या सर्वात विश्वासू अशा एलव्हीएम -3 या रॉकेट प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. चंद्रयान-3 या संपूर्ण मिशनला तुम्हाला इस्रोच्या वेबसाईटवर ( https://www.isro.gov.in ) आणि youtube चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सोय करण्यात आली आहे.
चांद्रयान-3 हे चंद्राच्या कधी न पाहीलेल्या गेलेल्या दक्षिण ध्रुवावर लॅंड होणार आहे. चार वर्षांपूर्वी चांद्रयान-2 मोहीम लॉंच करण्यात आली होती. सप्टेंबर 2019 साली चांद्रयान-2 मोहिम अवघ्या काही मिनिटांनी चंद्रावर लॅंडीग होण्यापूर्वीच विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर दोन्ही पृष्ठभागावर जोरात आदळल्याने निकामी होऊन त्यांचा संपर्क तुटल्याने ही मोहीम थोडक्यात फेल झाली होती. या नव्या चंद्रयान-3 मोहीमेतही एक लॅंडर आणि रोव्हर पाठविण्यात येणार आहे. चंद्रयान-3 चे उड्डाण जरी उद्या 14 जुलै रोजी होणार असले तरी प्रत्यक्षात चंद्रावर ते ऑगस्ट महिन्यात पोहचणार आहे.
पृथ्वीपासून चंद्र 3 लाख 84 हजार 400 किमी अंतरावर आहे. चंद्रावर कोणत्याही स्वरुपाचे वातावरण नसल्याने तेथे लॅंडींग करणे हे मंगळापेक्षा अवघड मानले जात आहे. जर चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाली तर भारत चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणारा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, जपान आणि चीन यांनी चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करण्यात यश मिळविले आहे.
चंद्रावर आतापर्यंत केवळ मानव पाठविण्यात अमेरिकेलाच यश आले आहे. साल 1969 ते 1979 चंद्रावर अमेरिकेने 12 अंतराळवीर पाठविले आहेत. त्यानंतर चंद्रावर गेल्या पन्नास वर्षांत मानव गेलेला नाही. या मोहीमा प्रचंड खर्चिक असल्याने भविष्यात अनेक देश मिळून या मोहीमा राबवाव्या लागतील असे 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिले पाऊल टाकणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांनी म्हटले होते.