Chandrayaan 3 mission | चंद्रयान – 3 मोहिम, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, वाचा सविस्तर

| Updated on: Aug 22, 2023 | 12:03 AM

चंद्रयान मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. आता यानाचं डिबुस्टिंग आणि लँडिंग साईटवर सूर्योदयाची प्रतीक्षा आहे. सध्या चंद्राच्या 25 बाय 100 किलोमीटरच्या कक्षेत भारताचं यान फिरतंय.

Chandrayaan 3 mission | चंद्रयान - 3  मोहिम, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, वाचा सविस्तर
Chandrayaan 3 Mission
Follow us on

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : रशियाला अपयश आल्यानंतर साऱ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्रयान 3 कडे आहेत. भारताचं चंद्रयान सुस्थितीत आणि नियोजीत वेळेप्रमाणेच चंद्राच्या दिशेनं प्रवास करतंय. सध्या चंद्राच्या 25 बाय 100 किलोमीटरच्या कक्षेत भारताचं यान फिरतंय. म्हणजे जेव्हा लंबवर्तुळाकार प्रदक्षिणेवेळी यान चंद्राच्या अगदी जवळ येतं, तेव्हा अंतर फक्त 25 किलोमीटर आणि जेव्हा लांब जातं, तेव्हा अंदाजे 100 किलोमीटर अंतर यान आणि चंद्रादरम्यान राहतं.

जर यानाला हे 25 किलोमीटर अंतर पार करायचं असेल तर ते काही मिनिटात पार करु शकतं. मग तरी अजून लँडिंगसाठी 3 दिवसांचा अवकाश का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हा यानाला डीबूस्ट म्हणजे वेग कमी केला जातो, तेव्हा प्रचंड काळजी घ्यावी लागते. 21-22 आणि 23 या 3 दिवसात यानाच्या सर्व उपकरणांचं परीक्षण केलं जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याठिकाणी आपलं यान उतरणार आहे, तिथं सूर्योदयाच्या प्रतीक्षेसाठी आपल्याला 23 तारखेपर्यंत थांबावंच लागेल. कारण सूर्याशिवाय सौरउर्जा मिळणार नाही आणि सौरउर्जेशिवाय आपलं यान निकामी होईल.

चंद्रावरचा एक दिवस 14 दिवसांचा

यानातील लँडर हे चंद्राच्या पृष्टभागावर उतरेल आणि उतरल्यानंतर त्यामध्ये असलेला रोव्हर बाहेर पडून चंद्राच्या पृष्टभागाचा अभ्यास करेल.
लँडर आणि रोव्हर ही दोघं उपकरणं या सोलर पॅनलद्वारे कामं करतील आणि सोलर पॅनलला उर्जा सूर्याद्वारेच मिळेल.

तुम्हाला दुसरा प्रश्न पडेल तो म्हणजे आपलं यान सूर्यास्तानंतर म्हणजे फक्त 12 तासानंतर निकामी होईल का? कारण सूर्य सकाळी 6 ला उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. पण हा नियम पृथ्वीवर लागू होतो, चंद्रावर नाही. पृथ्वीवरचा एक दिवस चंद्रावर 14 दिवसांचा असतो. कारण पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचा फिरण्याचा वेग प्रचंड कमी आहे. म्हणूनच चंद्रावरचा एक दिवस 14 दिवसांचा आणि एक रात्रही 14 दिवसांची असते.

लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्टभागावर अनेक प्रयोग करणार

भारताचं चंद्रयान ३ साधारण चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात उतरणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव भाग पृथ्वीवरुन कधीच दिसत नाही. कारण पृथ्वीच्या गुरुत्वकर्षणामुळे चंद्राच्या फिरण्याची बाजू एकच आहे. म्हणून ती बाजू कधीच पृथ्वीच्या दिशेनं येत नाही. जिथला खूप सारा भाग हा कायम अंधारातच असतो.

जेव्हा सूर्य या भागातून उदयाला येईल, तेव्हा याच ठिकाणी भारताचं यान उतरेल आणि या भागात पुन्हा रात्र होण्यासाठी पुढचे 14 दिवस लागतील. तोपर्यंत भारताचं लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्टभागावर अनेक प्रयोग करेल.

आता चंद्राच्या आजवरच्या सर्व लँडिंग साईटही बघूयात. 3 फेब्रुवारी 1966 ला रशियाचं लूना 9 यान उतरलं होतं. त्याच वर्षी लुना 13 या भागात उतरलं. रशियापाठोपाठ 1966 मध्येच अमेरिकेचं सर्व्हेयर 1 या भागात उतरलं. नंतर 1967 ला सर्व्हेयर 3 या भागात. 1967 मध्येच सर्व्हेयर 5 आणि 6 या भागात उतरले. 1969 ला अमेरिकेचं मानवी मिशन अपोलो 11 इथं उतरलं. जेव्हा चंद्रावर पहिल्यांदा माणसानं पाऊल ठेवलं.

…तर भारत पहिला देश ठरणार

रशियाची याआधीची चंद्रमोहिम म्हणजे 1976 सालची लुना 24 याठिकाणी लँड झाली. विसाव्या शतकात चीनचं चँग यान या भागात उतरलं.. मात्र भारताचं चंद्रयान-२ चं वैशिष्टय होतं की ते यान या साऱ्या लँडिंग साईटवरुन हजारो किलोमीटर दूर या भागात
उतरणार होतं. पण ती मोहिम अयशश्वी ठऱली. रशियानं 1976 नंतर याच महिन्यात लाँच केलेलं लुना 25 यान सुद्धा या भागात उतरणार होतं, पण ते ही फेल झालं. आणि येत्या 2 दिवसात भारताचं चंद्रयान 3 हे याठिकाणी उतरेल. चंद्रावर यान उतरवणारा देश म्हणून भारत जगातला चौथा देश आहे आणि दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा जगातला पहिला देश बनेल.

आपण जर आजवरच्या चंद्रमोहिमांचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल, की अमेरिका-रशियानं त्यांच्या चंद्रमोहिमा ७० च्या दशकानंतर बंद केल्या. बहुतांश लोकांचा असा ग्रह झाला होता की चंद्रावर खड्ड्यांपलीकडे काहीही नाही. पण जेव्हा 2008 मध्ये चंद्रयान १ नं चंद्राच्या पृष्टभागावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे दिले, तेव्हापासून पुन्हा चंद्रावर जाण्याची स्पर्धा रंगली. भारताच्या चंद्रयान १ नंतर लगेच चीन चंद्रावर उतरला. १९७४ नंतर रशियानं २०२३ मध्ये दुसरी मोहिम केली. आणि २०२५ ला अमेरिका सुद्धा १९६९ नंतर दुसऱ्यांदा चंद्रावर मानवी यान पाठवणार आहे.

अंतराळ संस्थांना कुतूहल

चंद्राचा दक्षिण ध्रुव अजूनही संशोधकांना खुणावतो. हा भाग पृथ्वीवरुन दिसत नसला तरी तिथं सर्वच भागात अंधार आहे असं नाही. तिथंही सूर्य पोहोचतो. मात्र प्रचंड मोठे खड्डे आणि ओबड-धोबड रचनेमुळे काही भागात पूर्ण सूर्यप्रकाश पोहोचत नाही. जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा पृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या या बाजूमुळेच सूर्य झाकला जातो. ज्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो. वास्तवात सूर्याला कधी ग्रहण लागतच नाही, फक्त आपल्या म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो. ज्याला आपण पूर्ण सूर्यग्रहण समजतो.

जेव्हा चंद्र फिरताना बरोबर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्य चंद्रामुळे झाकला जातो. परिणामी पृथ्वीवरुन सूर्य काही काळासाठी दिसत नाही. कारण पृथ्वीवरुन दिसणाऱ्या सूर्याला चंद्र पूर्णपणे व्यापून टाकतो. दरम्यान, चंद्राच्या त्या दुसऱ्या भागात काय आहे, पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या दक्षिण धुव्रावर काय दडलंय, याचं कुतूहल जगभरातल्या अंतराळ संस्थांना राहिलंय. आणि येत्या 2 दिवसात भारताचं यान त्याच दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरणार आहे.