बंगळुरु : चंद्रावर असलेल्या प्रज्ञान रोव्हरबद्दल इस्रो चीफ एस. सोमनाथ यांनी महत्त्वाच वक्तव्य केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 मिशनमधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर आहेत. 23 ऑगस्टला भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल ठेवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. इस्रोच्या वैज्ञानिकांनी आपल्या कामगिरीने जगाला थक्क करुन सोडलं. अत्यंत कमी खर्चात भारताने आपली चांद्र मोहिम यशस्वी करुन दाखवली. सध्या चंद्रावर असलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये आहेत. पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. चंद्रावर 14 दिवस सूर्यप्रकाश आणि 14 दिवस रात्र असते. चंद्रावर रात्र होणार होती, त्यावेळी विक्रम आणि प्रज्ञान दोघांना इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्लीप मोडमध्ये टाकलं. सप्टेंबर महिन्यात चंद्रावर सूर्यप्रकाश आल्यानंतर इस्रोच्या टीमने विक्रम आणि प्रज्ञान दोघांना जाग करण्याचा प्रयत्न केला.
पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हापासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्येच आहेत. दरम्यान प्रज्ञान रोव्हरबद्दल इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एक महत्त्वाच वक्तव्य केलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेला रोव्हर पुन्हा Active होऊ शकतो. कोच्चीमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान सोमनाथ यांना विचारण्यात आलं, की रोव्हर पुन्हा Active होईल का? त्यावेळी इस्रो चीफने हो, ही शक्यता आहे, असं उत्तर दिलं. “रोव्हर चंद्रावर सध्या स्लीप मोडमध्ये आहे. तो पुन्हा सक्रीय होऊ शकतो. चंद्रावर रोव्हर शांततेत झोपला आहे. त्याला चांगली झोप घेऊ दे. आम्ही त्याला त्रास देणार नाही. जेव्हा त्याला झोपेतून उठायच असेल, तेव्हा तो उठेल. आम्ही त्याला त्रास देणार नाही” असं सोमनाथ यांनी सांगितलं.
स्लीप मोडमध्ये टाकण्याआधी काय केलं?
“चांद्रयान 3 मिशनच उद्दिष्ट्य पूर्ण झालं आहे. या मिशनच्या माध्यमातून गोळा केलेल्या डेटावर संशोधन सुरु आहे” असं इस्रो प्रमुख म्हणाले. या मिशनमध्ये लँडर, रोव्हरसह वेगवेगळी उपकरण होती. सगळ्यांनीच आपल काम चोख केलं. 2 सप्टेंबरला रोव्हर स्लीप मोडमध्ये गेला. विक्रम आणि रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्याआधी सर्व पेलोड्स बंद करण्यात आले.