बंगळुरु : मागच्या आठवड्यात चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. सर्व भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. इस्रोच्या कामगिरीमुळे जगभरात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडरने चांद्रभूमीला स्पर्श केला. भारताने पहिल्यांदाच चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलय. याआधी चांद्रयान-2 मोहिम शेवटच्या टप्प्यात फसली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरुतील इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली.
त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना त्यांचं भरभरुन कौतुक केलं. त्याचवेळी विक्रम लँडर चंद्रावर जिथे उतरला, त्या जागेला ‘शिवशक्ती’ पॉइंट असं नाव दिलं. त्याचवेळी चांद्रयान-2 मिशनमध्ये ज्या ठिकाणी पोहोचलो होतो, त्या जागेला ‘तिरंगा’ पॉइंट असं नाव दिलं.
सोमनाथ वादावर काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे नाव दिलय शिवशक्ती, त्यावरुन आता वाद निर्माण झालय. काहींनी त्यावर वेगळ मत नोंदवलय. स्वत: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलय. ‘शिवशक्ती’ नाव देण्यावरुन काहीही वाद नाहीय. यात काहीही चुकलेलं नाही असं इस्रोच्या प्रमुखांनी म्हटलय. चांद्रयान-3 जिथे उतरलं, त्या जागेला शिवशक्ती नाव का दिलं? त्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला, असं सोमनाथ म्हणाले.
विज्ञान आणि विश्वासाबद्दल इस्रो चीफ काय म्हणाले?
“शिवशक्ती आणि तिंरगा पॉइंट दोन्ही नाव भारतीयच आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे” असं सोमनाथ म्हणाले. “एस.सोमनाथ यांनी केरळ तिरुअनंतपूरम येथील एका मंदिरात दर्शन घेतलं. विज्ञान आणि विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याची सरमिसळ करु नये” असं सोमनाथ यांनी सांगितलं.
मी मंदिरात का जातो?
“मी संशोधक आहे. चंद्रावर संशोधन करतोय. विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणं हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे मी मंदिरात जातो, धार्मिक-शास्त्रीय पुस्तकांच वाचन करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. बाहेरच्या जगाचा शोध घेण्यासाठी मी विज्ञानाचा आधार घेतो आणि आतमधून स्वत:चा शोध घेण्यासाठी मंदिरात येतो” असं इस्रोच्या प्रमुखांनी सांगितलं.
….तर लँडर फेल होईल
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव खूप कठीण आहे. इथे डोंगर, दऱ्यांचा भाग आहे. छोट्याशा चुकीमुळे मिशनमध्ये लँडर फेल होऊ शकतो असं सोमनाथ यांनी सांगितलं.