मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : आजचा दिवस देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. भारतासह अवघ्या जगाच्या नजरा आज चंद्राकडे लागल्या आहेत. कारण भारताचं चांद्रयान 3 चंद्रावर लँड होणार आहे. चांद्रयान 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रभूमीला स्पर्श करणार आहे. लँडिंगच्या दोन तासआधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाईल. नंतर ते चंद्रावर लँड होईल. मात्र हे चांद्रयान 3 लँड होण्याआधी आठ टप्प्यातून जाणार आहे. ते आठ टप्पे नेमके कोणते आहेत? या आठ टप्प्यांमध्ये नेमकं काय होणार आहे, हे जाणून घेऊयात…
लँडर चंद्रावर उतरताना सरळ रेषेत उतरणं अपेक्षित आहे. 100 किलोमीट अंतरावर चंद्रावर उतरण्यासाठी या लँडरला 15 मिनिटं लागतील. 100 किलोमीटर अंतरावरून 30 किलोमीटरवर आल्यावर त्याचा वेग कमी केला जाईल. 10 मिनिटात ते 7.4 किलोमीटर अंतरावर पोहोचेल. पुढे 6.8 किमी अंतरावर पोहोचेल तेव्हा दुसरा टप्पा पूर्ण होईल. याच वेळेत लँडरचे पाय जमीनीच्या दिशेने सरळ होतील.
लँडर जेव्हा तिसरा टप्पा गाठेल. तेव्हा ते चंद्रापासून केवळ 800 मीटर अंतरावर असेल. चौथ्या टप्प्यात ते 150 मीटर उंचीवर असेल. तर पाचव्या टप्प्यात ते 60 मीटर उंचीवर असेल. सहावा टप्पा जेव्हा हे लँडर गाठेल तेव्हा ते चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 6-10 मीटर उंचीवर असेल.
यानंतर यानाच्या लँडिंगमधला अत्यंत निर्णायक आणि महत्वाचा टप्पा आहे. 6-10 मीटर उंचीवरून थेट एका सेकंदात हे लँडर चंद्रावर उतरेल. यावेळी लँडरचं इंजिन बंद असेल. इथे काही बिघाड झाला तरी यान सरळ रेषेतच चंद्रावर उतरतं. पुढे लँडर चंद्रावर उतरल्यावर त्यातून रोव्हर बाहेर येईल. त्यानंतर पुढचे चौदा दिवस लँडर आणि रोव्हर चंद्रावरच राहणार आहे.
चंद्रावर वातावरण नाहीये. त्यामुळे कोणतंही यान उतरवताना अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या चांद्रयान 3 चं लँडर 25 X 134 किलोमीटरच्या कक्षेत चंद्राभोवती फिरत आहे.
चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण पाहता चांद्रयान 3 चं लँडर हे स्वयंचलित मध्यमातून उतरेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पृथ्वीवरून चंद्राकडे रेडिओ सिग्नल पाठवण्यासाठी 1.3 सेकंदाचा वेळ लागतो. त्यामुळे ते पृथ्वीवरून नियंत्रित करणं कठीण जातं. त्यासाठी त्याला स्वयंचलित पद्धतीने बनवलं आहे. अवघा देश या मोहिमेकडे लक्ष देऊन आहे. आता प्रतिक्षा आहे ती आज संध्याकाळी होणाऱ्या लँडिंगची…