नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : भारताच्या मून मिशनसाठीचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज भारताचं चांद्रयान-3 हे संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. भारतासाठीचं हे सर्वात मोठं मिशन आहे. त्यामुळे या यानाच्या सर्व सिस्टिमची वेळोवेळी पाहणी केली जात आहे. आनंदाची बातमी म्हणजे यानातील सर्व सिस्टिम व्यवस्थित सुरू आहेत. मात्र, संशोधकांना शेवटच्या 17 मिनिटाची भीती वाटत आहे. या 17 मिनिटात काही गडबड तर होणार नाही ना? अशी भीती संशोधकांना वाटत आहे.
सर्व काही व्यवस्थित राहिलं तर आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान -3चं चंद्रावर लँडिंग होईल. याचवेळी भारताच्या मून मिशनला शेवटच्या 17 मिनिटात प्रवेश करावा लागेल. चांद्रयान-3 च्या लँडिंगची ही वेळ असणार आहे. लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं पाऊल ठेवेल. चंद्रावर उतरल्यानंतर काम सुरू करेल. लँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरमधून रँपच्या माध्यमातून 6 पायांचा प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल. इसरोची कमांड मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर तो चालू लागेल.
इसरोने चांद्रयान-3ची स्पीड आणि त्याच्या दिशेकडे लक्ष रोखून धरलं आहे. त्यासाठी इसरोने लाइव्ह ट्रॅकर लॉन्च केलं आहे. यावरून अंतराळात चांद्रयान-3 कुठे आहे हे दिसून येणार आहे. लँडिंगनंतर विक्रम सुरू होईल आणि कम्युनिकेट करू लागेल. नंतर रँप उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रँपमधून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. विक्रम लँडर प्रज्ञानचे फोटो काढेल आणि हे फोटो पृथ्वीवर पाठवेल.
चंद्रयानासोपत पेलोड्सही पाठवले आहेत. त्यातील रंभा, चास्टे, इल्सा आणि एरे चंद्राचं रहस्य उघडणार आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रम लँडरला लावण्यात आलेले रंभा, चास्टे, इस्ला आणि एरे हे चार पेलोड्स काम करण्यास सुरुवात करेल. यात रेडिओ एनाटॉमी ऑफ मून बाऊंड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अॅटमॉस्फिअर म्हणजे रंभा (RAMBHA)कडून चंद्राच्या पृष्ठभागावर येणारे सूर्याकडून येणारे प्लाझ्मा कणाचे घणत्व, त्याची मात्र आणि बदल याची तपासणी करेल.
चास्टे (ChaSTE) चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान तपासेल. तर इल्सा (ILSA) लँडिंग साईटच्या परिसरातील भूकंपीय घटनांचं संशोधन करतील. तर लेझर रेट्रोरिफ्लेक्टर एरे चंद्राच्या डायनामिक्सला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.