नवी दिल्ली : सध्या सर्व देशवासियांच लक्ष मिशन मूनवर आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या निकटच्या कक्षेत पोहोचलं आहे. विक्रम लँडरवर काल डिबूस्टची पहिली प्रक्रिया करण्यात आली. चांद्रयान 3 आता चंद्राच्या 113 किमी x 157 किमी पर्यंतच्या कक्षेत आहे. एक-एक करुन मिशनमधील अनेक टप्पे पार करण्यात आले आहेत. मून मिशनची ही आता लास्ट ओव्हर आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू आता महत्त्वाचा आहे. छोटीशी चूक अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. शुक्रवारी ISRO ने दोन गुड न्यूज दिल्या.
चंद्राचा काल अत्यंत जवळून काढलेला फोटो समोर आला. विक्रम लँडरच्या कॅमेऱ्यातून हा फोटो काढण्यात आला. दुसरं लँडरच यशस्वी डिबूस्टिंग. चांद्रयान 3 चा असाच प्रवास सुरु राहिला, तर नक्कीच 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी होईल.
भारत ठरणार पहिला किंवा दुसरा देश
चांद्रयान-3 च 14 जुलैला श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 5 ऑगस्टला चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 6,9 आणि 14 ऑगस्टला यानाने चंद्राच्या पुढच्या कक्षेत प्रवेश केला. म्हणजे यानाला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यात आलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला किंवा दुसरा देश ठरु शकतो.
म्हणून सॉफ्ट लँडिंगसाठी निवडला 23 ऑगस्टचा दिवस
आता अनेक भारतीयांच्या मनात प्रश्न आहे की, आपल्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. मुंबई-पुण्यामध्ये जितकं अंतर आहे, आपलं चांद्रयान-3 चांद्रभूमीपासून तितक्याच अंतरावर आहे. मग सॉफ्ट लँडिंगसाठी आपण इतके दिवस का घेतोय? 23 ऑगस्टलाच सॉफ्ट लँडिंग का करायच? त्याचं उत्तर असं आहे की, लँडर आणि रोव्हर दोघे पावर जनरेट करण्यासाठी सोलार पॅनलचा वापर करणार. आता चंद्रावर रात्र आहे. 23 ऑगस्टला चंद्रावर सूर्योदय होईल.
Chandrayaan-3 Mission:
View from the Lander Imager (LI) Camera-1
on August 17, 2023
just after the separation of the Lander Module from the Propulsion Module #Chandrayaan_3 #Ch3 pic.twitter.com/abPIyEn1Ad— ISRO (@isro) August 18, 2023
लँडरने कधी काढला चंद्राचा व्हिडिओ ?
गुरुवारी 17 ऑगस्टला चांद्रयान-3 च दोन भागांमध्ये विभाजन झालं. लँडर मॉड्युल आणि प्रॉप्लशन मॉड्युल वेगळे झाले. चंद्रापासून 30 किमी उंचीवर असताना लँडरचा वेग कमी करुन यशस्वी सॉफ्ट लँडिंग हे मिशनमधील सर्वात महत्त्वाच लक्ष्य असेल, असं इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी नुकतच सांगितलं. दरम्यान चंद्राचे नवीन फोटो समोर आलेत. इस्रोने शुक्रवारी एक व्हिडिओ टि्वट केला. लँडरवरील कॅमेऱ्याने हा व्हिडिओ काढला आहे. 15 ऑगस्टला हा व्हिडिओ काढण्यात आला होता. व्हिडिओमध्ये चंद्रावरील खड्डे दिसतायत.