बंगळुरु : मिशन चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच काऊंटडाऊन सुरु झालं आहे. सगळ्या देशाला उद्या संध्याकाळची प्रतिक्षा आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीला स्पर्श करेल. हे सगळं मिशन हाताळणाऱ्या इस्रोच्या कक्षात उत्सुक्ता आणि थोडीशी चिंता अशा दोन्ही भावना आहेत. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने काटेकोर नियोजन करुन सर्व आवश्यक काळजी घेतली आहे. अत्यंत छोट्यात-छोट्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुन त्याचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
मात्र, तरीही प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये थोडी हुरहूर, चिंता आहे. 2019 साली चांद्रयान-2 मिशनमध्ये अगदी शेवटच्या क्षणी लँडिंगला काही मिनिट बाकी असताना गडबड झाली होती. दोनच दिवसांपूर्वी रशियाच्या लूना-25 यानाच सुद्ध क्रॅश लँडिंग झालं होतं. त्यामुळे उत्सुक्ता आणि चिंता या दोन्ही भावना असणं स्वाभाविक आहे.
इस्रो प्रमुख काय म्हणाले?
जे ठरवलय तसं घडावं, यासाठी इस्रोचे वैज्ञानिक वारंवार मिशन संदर्भात प्रत्येक गोष्टीची पडताळणी चेकिंग करत आहेत. इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी यशस्वी सॉ़फ्ट लँडिंगचा विश्वास व्यक्त केला आहे. “मिशनची तयारी सुरु असल्यापासूनच आम्हाला विश्वास होता. चंद्रावरच्या आतापर्यंतच्या प्रवासात प्रॉप्लशन मॉड्युल आणि लँडर मॉड्युलने कुठल्याही अडचणीशिवाय प्रवास केला आहे” असं सोमनाथ टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले.
शास्त्रज्ञ सध्या काय करतायत?
“या टप्प्यापर्यंत तरी सर्वकाही व्यवस्थित असल्याचा आम्हाला विश्वास आहे. अजूनपर्यंत तरी कुठल्या आपत्तीचा सामना करावा लागलेला नाही. आम्ही सर्व तयारी केलीय. या टप्प्यापर्यंत यानातील सर्व सिस्टिम आम्हाला हव्या तशा काम करत आहेत. आमच्याकडून सर्व सिस्टिमची डबल पडताळणी. उपकरणांची तपासणी आणि सराव सुरु आहे. आज आणि उद्या चांद्रयान-3 ची तपासणी होईल” असं सोमनाथ म्हणाले.
सध्या प्रॉप्लशन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहे. लँडिंग मॉड्युल चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज आहे. चांद्रयान-3 ने चांद्रयान-2 मिशनमधील ऑर्बिटरशी संपर्क प्रस्थापित केला आहे. लँडर ऑर्बिटरशी कनेक्ट होणं, हा सुद्धा यान सुस्थितीत असल्याचा एक संकेत आहे.