बंगळुरु : चंद्रावर पुन्हा एकदा हालचाल वाढणार आहे. चंद्रावर सूर्योदय होणार आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी आहे, त्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येणार आहे. लँडिंगनंतर 11 दिवसांनी विक्रम लँडर आणि प्रज्ञा रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्यात आलं होतं. चंद्रावर दोघेही बाजू-बाजूला आहेत. 22 सप्टेंबरला शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येईल. सूर्योदयानंतर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होऊ शकतात. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर बरोबर पुन्हा एकदा कम्युनिकेशन स्थापित करण्याचा प्रयत्न होईल. चांद्रयान-3 साठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. शिवशक्ती पॉइंटवर लवकरच सूर्योदय होईल, असं एक्सवर बुधवारी इस्रोकडून सांगण्यात आलं. विक्रम आणि प्रज्ञानला सूर्यप्रकाश मिळेल. ही दोन्ही उपकरण पुन्हा चालू होतील अशी अपेक्षा आहे.
रोव्हर आणि लँडरला अशा पद्धतीने ठेवण्यात आलय की, सूर्योदय झाल्यानंतर सूर्यप्रकाश थेट पॅनलवर येईल. चांद्रयान-3 मिशनतंर्गत चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला पाठवण्यात आलय. लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावर अनेक प्रयोग करण्यात आले. आता 22 सप्टेंबरला विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होतील अशी आशा आहे. आपण फक्त अपेक्षा करु शकतो, दोन्ही पुन्हा सक्रीय होऊन काम सुरु करतील असं इस्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले. चांद्रयान-3 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरलं. अशी कामगिरी करुन भारताने नवीन इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला.
उद्याची उत्सुक्ता का?
चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर उपकरणांची निर्मिती 14 दिवस सूर्यप्रकाशात काम करतील अशा पद्धतीने करण्यात आली आहे. चंद्रावर रात्रीच्यावेळी मायनस 200 तापमान असतं. या वातावरणात उपकरण गोठून जातील. त्यामुळे उद्या विक्रम आणि प्रज्ञान काम सुरु करतील का? याची उत्सुक्ता आहे. पृथ्वीवरच 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. तिथे 14 दिवस सूर्यप्रकाश, 14 दिवस रात्र असते. इस्रोसाठी काही अशक्य नाहीय. लँडर आणि रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्याआधी इस्रोने होप चाचणी यशस्वी केली होती. म्हणजे लँडरच दुसऱ्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं होतं.