नवी दिल्ली : आज दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या सतीश धवन अवकाश तळावरुन भारताच चांद्रयान-3 मिशन लॉन्च होईल. भारताची ही तिसरी चांद्र मोहिम आहे. चार वर्षांपूर्वी 2019 साली भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेत ठरवलेले सर्व निकष पूर्ण झाले नव्हते. लँडर आणि रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं होतं. त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण असं वैज्ञानिक संशोधन अपूर्ण राहिलं होतं. चांद्रयान-3 मिशनद्वारे तीच उद्दिष्टय पूर्ण करण्याच लक्ष्य आहे.
आज चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावल्यानंतर लँडर आणि रोव्हरला चंद्रावर लँड होण्यासाठी महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. म्हणजे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर लॅण्डिंग अपेक्षित आहे.
मागचं लँडिंग फसलं तिथेच लँडर उतरवणार
चांद्रयान-2 चं लँडिंग जिथे फसलं होतं, तिचं जागा इस्रोने चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी निवडली आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर प्रग्यान रोव्हरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करण्यात येणार आहे.
अमेरिका, रशियापेक्षा भारताची चांद्र मोहिम सर्वात कठीण का?
ठरवलय तसं सर्व घडलं, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरेल. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन आणि जापान या चार देशांनाच चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आलं आहे. या चारही देशांच्या स्पेसक्राफ्टच विषुववृत्तीय उत्तरेकडच्या बाजूला लँडिंग झालं आहे. भारत दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा पहिला देश ठरु शकतो.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कसं असेल हवामान?
आतापर्यंत बऱ्याच चांद्र मोहिमा झाल्या पण कुठल्या देशाने दक्षिण ध्रुवावर लँडिंगचा प्रयत्न का केला नाही? खरंतर चंद्राचा दक्षिण ध्रुवाचा भाग सर्वात खडतर, कठीण समजला जातो. दक्षिण ध्रुवावर काही भागात पूर्णपणे अंधार आहे. इथे सूर्यकिरणही पोहोचत नाहीत. इथलं वातावरणच खूप विचित्र आहे. गारठवून टाकणारी थंडी इथे असते. तापमान -230 डिग्री सेल्सिअसमध्ये असतं.
इस्रोसमोरच चॅलेंज काय?
काळाकुट्ट अंधार आणि थंडी यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं चालवण एक मोठं चॅलेंज आहे. दक्षिण ध्रुवावर बरेच खड्डे आहेत. भारताला चांद्रयान 1 मोहिमेत पाण्याबाबत काही गोष्टी आढळून आल्या होत्या. चांद्रयान 3 मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याबाबत काही ठोस माहिती हाती लागू शकते.