बंगलुरु | 4 ऑगस्ट 2023 : भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीम आता महत्वाच्या टप्प्यावर आहे. चंद्रयान-3 चंद्रावर स्वारी करण्यासाठीचे दोन तृतीयांश अंतर कापले आहे. शुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ही माहीती दिली आहे. चंद्रयान-3 ने 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतिश धवन केंद्रातून रॉकेटच्या सहाय्याने उड्डाण घेतल्यानंतर पृथ्वी भोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. एक ऑगस्ट रोजी चंद्रयानने ट्रान्स लूनार इंजेक्शनद्वारे ( टीएलआय ) 288 किमी गुणिले 3.7 लाख किमीची कक्षेत प्रवेश केला आहे आणि चंद्राच्या प्रभाव क्षेत्रात प्रवेश केला आहे.
चंद्रयान-3 ला प्रक्षेपित केल्यानंतर त्याने पृथ्वीभोवतीच्या लंबवतृळाकार पाच फेऱ्यांना यशस्वीपणे पूर्ण केले आहे. प्रत्येक फेरी नंतर त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर वाढत नेले होते. एक ऑगस्ट रोजी त्याला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेकडे पाठविण्याची प्रक्रीया यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे. ट्रान्सलुनर कक्षा असे त्याचे नाव आहे. इस्रोच्या म्हणण्यानूसार उद्या आणखी एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. चंद्रयानला चंद्राच्या कक्षेत स्थापित केले जाणार आहे.
इस्रोने म्हटले आहे की अंतराळ यानला चंद्राच्या कक्षेत स्थापित करण्याची प्रक्रीया 5 ऑगस्टला सायंकाळी सात वाजता सुरु होईल. ज्यावेळी चंद्रयान-3 ज्यावेळी चंद्राच्या सर्वात जवळ असेल त्याचवेळी ही प्रक्रीया केली जाईल. चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण गोलार्धात सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. यामुळे अमेरिका, रशिया, चीन नंतर आपला चंद्रावर सफल सॉफ्ट लॅंडींग करणारा भारत चौथा देश बनणार आहे.
14 जुलै रोजी चंद्रयान-3 च्या लॉंचिंगनंतर शनिवारी 22 दिवस पूर्ण होतील. चंद्रयान-3 विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर सफल लॅंडींग झाल्यावर संशोधन करणार आहेत. इस्रोने म्हटले आहे की सफल चंद्रयान -ऑर्बिट इंसर्शनसाठी ( एलओआय ) आम्ही आश्वस्थ आहोत. कारण चंद्रयान-2 ( 2019 ) आणि चंद्रयान – 1 ( 2008 ) मध्ये या कामात आम्हाला यश मिळाले आहे.