नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहिमेने आणखी एक यशाचा पल्ला गाठला आहे. चंद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर यशस्वीपणे 100 मीटर अंतर कापले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आता चंद्रावर सूर्याचा प्रकाश कमी होणार असल्याने आता विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडमध्ये नेण्याची तयारी करीत आहेत. म्हणजे चंद्राचा एक दिवस ( पृथ्वीवरील 14 दिवस ) आता संपण्याच्या बेतात आहे. आज भारताचे आदित्य एल-1 सु्र्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी चंद्रयान-3 च्या अखेरच्या टप्प्याची तयारी सुरु असल्याचे जाहीर केले.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी शनिवारी सांगितले की चंद्रावर गेलेले चंद्रयान-3 चे रोव्हर आणि लॅंडर व्यवस्थित काम करीत आहेत. परंतू आता चंद्रावर रात्र सुरु होणार असल्याने त्यांना निष्क्रीय केले जाईल. लॅंडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर आताही काम करीत आहेत. रोव्हरने 100 मीटरचे अंतर कापले आहे. त्यांनी खूप सारा डाटा पाठविला आहे त्याचे विश्लेषण इस्रोची टीम करीत आहे.
इस्रोने ट्वीट करीत रोव्हरने 100 मीटर अंतर कापल्याचे सांगितले –
Chandrayaan-3 Mission:
🏏Pragyan 100*
Meanwhile, over the Moon, Pragan Rover has traversed over 100 meters and continuing. pic.twitter.com/J1jR3rP6CZ
— ISRO (@isro) September 2, 2023
सोमनाथ म्हणाले की ही चांगली बातमी आहे की रोव्हरने शंभर मीटरचे अंतर कापले आहे. आम्हाला येत्या दोन दिवसात त्यांना स्लीप मोड नेण्याची प्रक्रीया सुरु करावी लागेल. कारण चंद्रावर आता रात्र होणार आहे. त्यामुळे तापमान खाली घसरून सोलार पॅनलला सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्यामुळे त्यांना निष्क्रीय करावे लागणार आहे. हे चंद्रयान-3 मोहीम चंद्राच्या एक दिवसासाठी आखण्यात आली होती. म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस. चंद्रयान-3 गेल्या 23 ऑगस्टच्या सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंड झाले होते. आदित्य एल-1 चे श्रीहरिकोटातून सकाळी सुर्याच्या दिशेने यशस्वी उड्डाण झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी सांगितले.
चंद्रयान-3च्या रोव्हर प्रज्ञानवर लावलेल्या उपकरणांनी चंद्रावर सल्फर ( गंधक ) शोधले होते. इस्रोने रोव्हरने क्रेटर चुकवत कसा सुरक्षित रस्ता निवडला याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. तसेच रोटेशन होणाऱ्या रोव्हरचाही व्हिडीओ पोस्ट केला होता. विक्रम लॅंडरमधील कॅमेऱ्यांनी काढलेले हे व्हिडीओ आजही सोशल मिडीयावर कुतूहलाने पाहीले जात आहेत. चंद्रयान-3 चे 14 जुलै 2023 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीपणे लॉंचिंग करण्यात आले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडीग करणारा भारत पहिला देश बनला आहे. या मोहिमेचा उद्देश्य चंद्रावर पाणी शोधणे आणि पृष्ठभागाचा अभ्यास करणे हा होता.