IAS Abhishek Prakash Suspended: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर प्रहार करणे सुरु केले आहे. कधीकाळी त्यांचा जवळचा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आयएसएस अभिषेक प्रकाश यांचे निलंबन करण्यात आले आहे. अभिषेक प्रकाश तीन वर्ष लखनऊचे जिल्हाधिकारी राहिले होते. परंतु आता उद्योगपतीकडून लाच प्रकरणात त्यांचे नाव समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. लखनऊचे जिल्हाधिकारी असताना डिफेंस एक्सपोचा जमीन अधिग्रहणासंदर्भातील आरोप त्यांच्यावर लागले होते. परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती.
उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणण्याची जबाबदारी असलेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूक विभागाचे सीईओ आणि औद्योगिक विकास विभागाचे अभिषेक प्रकाश सचिव होते. एका गुंतवणूकदार उद्योगपतीकडून मध्यस्थामार्फत लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. या प्रकरणात मध्यस्थ असलेला निकांत जैन यांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी SAEL solar P6 या कंपनीने अर्ज केला होता. कंपनीचे मालक विश्वजीत दत्ता उत्तर प्रदेशात सोलर सेल, सोलर पॅनल व सोलर प्लॅट लावणार होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. विश्वजीत दत्ता यांचा आरोप आहे की, आम्ही 5% कमीशन दिले नसल्यामुळे आमचा अर्जावर विचार केला नाही. याबाबत अभिषेक प्रकाश यांनी निकांत जैन यांना भेटण्यास सांगितले. जैन यांनी होकार दिल्यावर अर्ज मंजूर होणार असल्याचे म्हटले.
विश्वजीत दत्ता यांनी निकांत जैन यांची भेट घेतल्यावर त्यांनी 5% कमीशनची मागणी केली. यामुळे विश्वजीत दत्ता यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्री योगी यांनी या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरु केली. त्यानंतर प्रकरणात तथ्य आढळल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी निकांत जैन याला अटक झाली आहे. योगी सरकारने आतापर्यंत 11 आयएएस अधिकाऱ्यांवर विविध प्रकरणात कारवाई केली आहे.
अभिषेक प्रकाश हे 2006 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 1982 मध्ये जन्मलेला अभिषेक प्रकाश हे मूळचे बिहारचे आहेत. सध्या ते उत्तर प्रदेश सरकारचे सचिव, आयडीसी विभाग आणि सीईओ इन्व्हेस्ट यूपी यांचा पदभार सांभाळत होते.